

महापालिका इमारतींना
पाडकामापूर्वी बॅरिकेडिंग
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सचिवांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : धारावीतील रहिवाशांच्या पुनर्वसन बांधकामाला गती देण्यासाठी धारावीच्या शाहूनगर येथील रिकाम्या मुंबई महापालिका इमारतींना पाडकामापूर्वी बॅरिकेडिंग करण्यात येत आहे. महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या परवानगीने ही कार्यवाही सुरू असल्याची माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे (डीआरपी) सचिव विपिन पालीवाल यांनी दिली. माटुंगा येथील रेल्वेच्या २२ एकर जागेवर नुकत्याच झालेल्या भूमिपूजनानंतर हे पाऊल उचलले आहे.
शाहूनगर येथे बिगर-झोपडपट्टी बांधकामे आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या योजनेनुसार सर्व पात्र बिगर-झोपडपट्टी मालक, म्हणजे महापालिकेने प्रमाणित केलेले त्यांच्या भाडेकरूंना किमान ५०० चौरस फूट किंवा त्यांच्या सध्याच्या चटई क्षेत्राच्या १.३५ पट, यांपैकी जे अधिक असेल तेवढे चटई क्षेत्र मिळण्याचा अधिकार आहे. रहिवाशांना लवकरात लवकर नव्या घरांत जाता यावे यासाठी प्रकल्पाला गती दिली जात असल्याचे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे (डीआरपी) सचिव विपिन पालीवाल यांनी सांगितले. पादचारी आणि परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी बॅरिकेड्स उभारण्यात येत आहेत.
डीसीपीआर २०३४ च्या विनियम ३३(९)(ए) अन्वये शाहूनगरचा पुनर्विकास केला जात आहे. त्यानुसार मोडकळीस आलेल्या जागांच्या बदल्यात नव्याने बांधलेली कायमस्वरूपी सदनिका देण्यास डीआरपी/एसआरए बांधिल आहे. ही सदनिका हस्तांतरित होईपर्यंत रहिवाशांना संक्रमण निवासात सामावून घेतले जाईल आणि नव्या सदनिका शाहूनगरमध्येच विकसित व वितरित केल्या जातील. दरम्यान, येथील एकूण १,०४० रहिवाशांपैकी १६४ महापालिका कर्मचारी निवासस्थाने कर्मचाऱ्यांनी योग्य प्रक्रिया पूर्ण करून स्वेच्छेने रिकामी केली आहेत.
इमारती पुनर्विकासासाठी सुपूर्द
महापालिकेच्या मालमत्ता विभागासोबत कायमस्वरूपी पर्यायी निवास करार (पीएएए) करण्यात आला असून, इमारती रिकाम्या करून पुनर्विकासासाठी सुपूर्द करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित ८७६ भाडेकरूंना पीएमजीपी कॉलनी येथील म्हाडाच्या इमारतीतील संक्रमण निवासात हलवण्याचा किंवा भाडे सहाय्य देण्याचा प्रस्ताव आहे. त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी लवकरच शिबिर आयोजित केले जाणार असल्याचे विपिन पालीवाल यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.