

कार मुंबईत अन् कर परराज्यात
ताडदेव आणि अंधेरी आरटीओचा कारवाईचा बडगा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : महाराष्ट्रातील मोटार वाहन कर टाळण्यासाठी परराज्यांत नोंदणी करून मुंबईत वापरल्या जाणाऱ्या आलिशान वाहनांविरोधात परिवहन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत मर्सिडीज, लँड रोव्हर डिफेंडर, पोर्शेसह विविध महागड्या गाड्यांच्या १३२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. करचुकवेगिरीसाठी परराज्यात नोंदणी करण्याचा मार्ग सुचविणाऱ्या वाहन वितरकांचीही चौकशी केली जात आहे.
परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार मुंबईतील प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी ५ ऑक्टोबरपासून ही मोहीम सुरू केली. सुरुवातीच्या तपासणीत ४५ प्रकरणे समोर आली असून, दोन महागडी वाहने जप्त करण्यात आली. तसेच चार प्रमुख वाहन डीलरशिपची तपासणी सुरू आहे. या प्रकरणांमध्ये सुमारे चार ते पाच कोटी रुपयांचा मोटार वाहन कर थकीत असल्याचा प्राथमिक अंदाज परिवहन विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शुक्रवारी (ता. १६) वांद्रे-वरळी सागरी सेतू टोलनाक्यावर तीन वायुवेग पथकांच्या माध्यमातून विशेष तपासणी केली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पाच मोटार वाहन निरीक्षक आणि पाच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या पथकाने ६५ वाहनांची तपासणी केली. त्यापैकी ३५ वाहनांना महाराष्ट्र मोटार वाहन कर भरण्यासाठी चलन देण्यात आले. काही वाहनांची अलीकडेच परराज्यात नोंदणी झाल्याचेही तपासणीत आढळले.
महाराष्ट्रात महागड्या आणि आयात केलेल्या वाहनांवर त्यांच्या किमतीनुसार मोठ्या प्रमाणात मोटार वाहन कर आकारला जातो. त्यामुळे कमी कर असलेल्या राज्ये अथवा केंद्रशासित प्रदेशांतील पत्त्यांचा वापर करून वाहन नोंदणी केल्याच्या प्रकरणांची आता छाननी केली जात आहे. केवळ कर वाचविण्यासाठी नियमांना बगल देऊन परराज्यात वाहन नोंदणी करू नये. महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा नियमानुसार कर भरावा, असे आवाहन परिवहन विभागाने वाहनधारक आणि वितरकांना केले आहे.
==
बनावट पत्ते वापर
महाराष्ट्रामध्ये महागड्या आणि आयात केलेल्या गाड्यांवरील रस्ता कर वाहनाच्या किमतीच्या १५ % ते २० % असतो. ५० लाख ते दोन कोटी रुपयांपर्यंत किंमत असलेल्या आलिशान गाडीसाठी हे कर बिल अनेक लाख रुपयांपर्यंत जाते. बनावट पत्ते किंवा शेल सेटअपचा वापर करून डीडी मालिकेअंतर्गत वाहनांची नोंदणी करून, खरेदीदार आपली कर जबाबदारी नियमित वैधानिक रकमेच्या जवळपास निम्मी किंवा एकतृतीयांशपर्यंत कमी करतात, असे तपास पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.