

काँगो ते श्रीलंकेपर्यंत कोकण रेल्वेची भरारी!
परदेशातील मेट्रो आणि रेल्वे पूल प्रकल्पांत सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : देशांतर्गत रेल्वे प्रकल्पांमधील अनुभवाच्या बळावर कोकण रेल्वेने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार सुरू केला आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोतील मेट्रो प्रकल्प आणि श्रीलंकेतील रेल्वे पुलांच्या पुनर्वसन व बांधकामाच्या निविदा प्रक्रियेत कोकण रेल्वे सहभागी झाली आहे. याचबरोबर लोणे येथील रोलिंग स्टॉक कॉम्पोनंट फॅक्टरीच्या संचालन आणि देखभालीसाठी २४९ कोटी रुपयांचा पाच वर्षांचा करार मिळाला आहे. या प्रकल्पांमुळे रेल्वे अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील कोकण रेल्वेच्या कामाचा आवाका वाढत असल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली.
काँगोतील मेट्रो बांधकाम प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पातून मेट्रो उभारणीच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी कोकण रेल्वेला मिळणार आहे. देशांतर्गत रेल्वे प्रकल्पांमध्ये विकसित केलेले अभियांत्रिकी कौशल्य आणि प्रकल्प व्यवस्थापनाचा अनुभव या कामासाठी उपयुक्त ठरणार आहे.
श्रीलंकेत रेल्वे पुलांच्या कामांसाठी सहभाग
श्रीलंकेतील रेल्वे पुलांचे पुनर्वसन आणि नवीन पूल बांधण्यासंबंधीच्या प्रकल्पांच्या निविदा प्रक्रियेतही कोकण रेल्वे सहभागी झाली आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय रेल्वे पायाभूत सुविधा क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे. काँगो आणि श्रीलंकेतील प्रकल्पांमधील सहभागामुळे परदेशातील रेल्वे व मेट्रो क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्याच्या कोकण रेल्वेच्या प्रयत्नांना चालना मिळणार आहे.
लोणे येथील कारखान्यासाठी २४९ कोटींचा करार
लोणे येथील रोलिंग स्टॉक कॉम्पोनंट फॅक्टरीच्या संचालन आणि देखभालीसाठी कोकण रेल्वेला २४९ कोटी रुपयांचा पाच वर्षांचा करार मिळाला आहे. या कारखान्यात एलएचबी डब्यांच्या बोगींचे उत्पादन आणि मोठ्या स्वरूपातील दुरुस्ती केली जाते. या कामाला २४ सप्टेंबरपासून सुरुवात झाल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली.
२३ हजार कोटींची कामे विविध टप्प्यांवर
कोकण रेल्वेने ३७ वर्षांची वाटचाल पूर्ण केली असून, १९९.६३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या अडीच वर्षांत कोकण रेल्वेला २० हजार ५९ कोटी रुपयांचे नवीन प्रकल्प मिळाले आहेत. सध्या २३ हजार ५५२ कोटी रुपयांची कामे विविध टप्प्यांवर सुरू आहेत. देशांतर्गत प्रकल्पांमधील अनुभव, तांत्रिक कौशल्य आणि प्रकल्प व्यवस्थापनाच्या बळावर परदेशातील कामांचा विस्तार करण्यावर कोकण रेल्वेचा भर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.