पाच कचरा केंद्रांचे आधुनिकीकरण

पाच कचरा केंद्रांचे आधुनिकीकरण
Published on: 

पाच कचरा केंद्रांचे आधुनिकीकरण
२३ कोटींचा प्रकल्प; स्थायी समितीसमोर प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबईतील पाच सुका कचरा वर्गीकरण केंद्रांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी २३ कोटी ३७ लाख रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या कामासाठी राइट्स लिमिटेडची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचा आणि संस्थेला ९२.५७ लाख रुपये शुल्क देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
मुंबईत दररोज सुमारे सहा हजार ५०० ते सात हजार मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. त्यापैकी ३० ते ४० टक्के कचरा सुका असतो. यामध्ये प्लॅस्टिक, कागद आणि पुनर्वापरयोग्य साहित्याचा समावेश आहे. या कचऱ्याचे प्रभावी वर्गीकरण करून पुनर्वापर वाढविण्यासाठी पाच केंद्रांतील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. केंद्रांचे रूपांतर अत्याधुनिक संसाधन पुनर्प्राप्ती सुविधांमध्ये करण्याचे नियोजन आहे.
या प्रकल्पामुळे पुनर्वापरयोग्य साहित्याची पुनर्प्राप्ती वाढण्यासह क्षेपणभूमीवरील कचऱ्याचा भार कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच कचरा वर्गीकरण आणि पुनर्वापराच्या माध्यमातून कचरा वेचकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.
या कामासाठी सूचीबद्ध असलेल्या तीन सल्लागार संस्थांच्या सादरीकरणानंतर तांत्रिक क्षमता, अनुभव, खर्चाची परिणामकारकता आणि शाश्वततेच्या निकषांवर राईट्स लिमिटेडची निवड करण्याची शिफारस तांत्रिक सल्लागार समितीने केली. संस्थेने प्रकल्पाचे तांत्रिक आराखडे, खर्चाचे अंदाजपत्रक आणि निविदा दस्तऐवज तयार केले आहेत.
प्रकल्पाची अंदाजित किंमत २३ कोटी ३७ लाख ७६ हजार ७३३ रुपये असून, राइट्स लिमिटेडला सल्लागार शुल्क आणि अंमलबजावणीसंबंधित शुल्क मिळून ९२ लाख ५७ हजार १८५ रुपये ६६ पैसे देण्याचे प्रस्तावित आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com