तिरंगा मार्च’मधील सीजेपीचे १०० हुन अधिक आंदोलक ताब्यात

तिरंगा मार्च’मधील सीजेपीचे १०० हुन अधिक आंदोलक ताब्यात
Published on: 

सीजेपीचे आंदोलक ताब्यात
वांद्र्यात ‘तिरंगा मार्च’; कार्टर रोडवर पोलिसांचा बंदोबस्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात आणि अटक करण्यात आलेल्या आंदोलकांच्या समर्थनार्थ रविवारी वांद्रे पश्चिम येथील कार्टर रोडवर ‘तिरंगा मार्च’ आयोजित करण्यात आला होता. यात सहभागी होण्यासाठी आलेल्या १०० हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे नियोजित मार्च होऊ शकला नाही.
अभिजित दीपके, नेहा बोरा, आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या समर्थनार्थ ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने (सीजेपी) या आंदोलनाचे आयोजन केले होते. नागरिकांना रविवारी सायंकाळी ५ वाजता कार्टर रोड येथे राष्ट्रध्वज घेऊन एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले होते, मात्र आंदोलनाला परवानगी नसल्याने पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता. कार्टर रोडवर येणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही आंदोलकांना घराबाहेर पडण्यापासून रोखण्यात आल्याचा दावाही आयोजकांकडून करण्यात आला. अभिनेता अमीन हाजी हे आंदोलनात सहभागी होण्यासाठी कार्टर रोडवर आल्यानंतर त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. सामाजिक कार्यकर्त्या आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांना शनिवारी आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असताना खार सबवेजवळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कार्टर रोडवरील एका मार्गिकेत पोलिसांनी बॅरिकेड्स उभारले होते, तर दुसरी मार्गिका वाहतुकीसाठी खुली ठेवण्यात आली. त्यामुळे परिसरात काही काळ मोठा पोलिस बंदोबस्त दिसून आला.
आयोजकांच्या आवाहनानंतरही आंदोलनाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. १००हून अधिक आंदोलक कार्टर रोडवर पोहोचले. पोलिसांच्या कारवाईनंतर नियोजित ‘तिरंगा मार्च’ पुढे जाऊ शकला नाही. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पोलिसांनी परिसरातील बॅरिकेड्स हटवले.
===
पोलिस आणि वकिलांमध्ये वाद
वकील वांद्रे पोलिस ठाण्यात गेले असता पोलिसांनी आंदोलकांना सोडण्यास नकार दिला. त्यावर नोटीस देऊन आंदोलकांना सोडा असे वकिलांचे म्हणणे होते, मात्र त्यासही पोलिसांनी नकार दिल्याने पोलिसांनी वकिलांमध्ये वाद झाला. रात्री उशिरापर्यंत आंदोलकांना सोडण्यात आले नव्हते.
==
मुलींना सायंकाळी ६ नंतरही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आम्ही शांततापूर्ण तिरंगा मार्च काढत होतो, मात्र त्यालाही परवानगी नाकरण्यात आली. आम्हाला ताब्यात घेण्यात आले. ही पोलिसांची दडपशाही सुरू आहे.
- साम्या कोरडे, आंदोलक
==
शांततेत तिरंगा मार्च करत असताना त्याला सरकार आणि पोलिस घाबरले आहे. काही लोकांना घरातून ताब्यात घेतले. आंदोलनासाठी आल्यानंतरही तरुणांना ताब्यात घेतले. सरकारला आंदोलनाची किती भीती आहे.
- उत्सव सिंग, आंदोलक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com