कोहिनूर स्क्वेअर कॉम्प्लेक्समध्ये नियमांचे उल्लंघन!

कोहिनूर स्क्वेअर कॉम्प्लेक्समध्ये नियमांचे उल्लंघन!
Published on: 

कोहिनूर स्क्वेअर कॉम्प्लेक्समध्ये नियमांचे उल्लंघन!
अग्निसुरक्षा, अनधिकृत बांधकामे, पार्किंग कराराच्या चौकशीची मागणी


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : दादर पश्चिम येथील कोहिनूर स्क्वेअर व्यावसायिक संकुलातील हॉटेलच्या स्वयंपाकघराला सोमवारी सकाळी आग लागल्यानंतर या इमारतीतील कथित नियमबाह्य बाबींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. सागर वराडकर यांनी संकुलातील अग्निसुरक्षा व्यवस्था, भोगवटा प्रमाणपत्र, अनधिकृत बांधकामे आणि सार्वजनिक पार्किंग व्यवस्थेबाबत गंभीर आक्षेप घेत महापालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वराडकर यांच्या तक्रारीनुसार, ‘संकुलातील काही व्यावसायिक जागा भोगवटा प्रमाणपत्र, अग्निशमन परवानगी आणि आवश्यक संरचनात्मक मंजुरीशिवाय वापरल्या जात असल्याचा संशय आहे. बास्टियन रेस्टॉरंटच्यावरच्या मजल्यावरील कथित अनधिकृत बांधकामाबाबतही त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. यासंदर्भात यापूर्वी स्मरणपत्रे पाठवूनही कारवाई झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. संकुलातील सार्वजनिक पार्किंग व्यवस्थापनासाठी मेसर्स सिद्धी विनायक इंडस्ट्रीजसोबत करण्यात आलेल्या २२.०८ कोटी रुपयांच्या कथित अनोंदणीकृत कराराची चौकशी करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. पार्किंग परिसरातील अग्निसुरक्षेच्या त्रुटींमुळे यापूर्वी तीन गाड्या जळाल्याचा दावाही वराडकर यांनी केला आहे. तसेच, निर्वासित क्षेत्रांचा वापर आणि इमारतीतील कथित संरचनात्मक बदलांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

तक्रारींचा पाठपुरावा
गेल्या काही महिन्यांत जी/उत्तर विभाग कार्यालयात २५ हून अधिक वेळा भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारींचा पाठपुरावा केल्याचे वराडकर यांनी म्हटले आहे, मात्र अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संबंधित कंत्राटदार आणि दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवावा, पार्किंग कराराची चौकशी करावी आणि कथित अनधिकृत बांधकामांबाबत स्वतंत्र तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com