किनारा रस्त्याच्या उत्तर भागातील कामांना गती द्या

किनारा रस्त्याच्या उत्तर भागातील कामांना गती द्या
Published on: 

किनारा रस्त्याच्या उत्तर भागातील कामांना गती द्या
अश्विनी भिडे यांच्याकडून प्रकल्पस्थळांची पाहणी; चारकोपमध्ये दुहेरी बोगद्याचे काम सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून पश्चिम उपनगरांतील प्रवास अधिक वेगवान करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाच्या कामांना गती देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सोमवारी (ता. १९) दिले. गोरेगाव, लोखंडवाला, मालाड, कांदिवली आणि चारकोप येथील विविध प्रकल्पस्थळांची पाहणी करून त्यांनी कामांचा आढावा घेतला.
कामांचा वेग वाढविताना सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि निर्धारित कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. सुमारे ६० किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प वेसावे ते भाईंदर या भागांना जोडणार आहे. आंतरबदल आणि जोडरस्त्यांसह प्रकल्पाची सात पॅकेजमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामुळे पश्चिम उपनगरांतील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. दिंडोशी न्यायालय परिसरातील गोरेगाव कनेक्टरच्या पाहणीने आयुक्तांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. गोरेगाव ते ओबेरॉय मॉलदरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या ३८ खांबांपैकी ११ खांबांचे काम पूर्ण झाले असून, जलवाहिनी स्थलांतराचे काम सुरू आहे. गोरेगावमधील विद्यमान वीर सावरकर उड्डाणपूल न पाडता त्यावरून नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे.
लोखंडवाला-मिल्लत नगर जंक्शन येथे सुमारे १० हेक्टर जागेचे संपादन पूर्ण झाले असून, पायाभरणीची कामे सुरू आहेत. भगतसिंग नगर येथील ओशिवरा खाडीवरील उड्डाणपुलाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याचे निर्देश भिडे यांनी दिले. पुलाच्या जोडरस्त्यासाठी आवश्यक बांधकामे हटविण्याबाबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी समन्वय साधण्यासही सांगितले.
मालाडमधील माइंडस्पेस परिसरात पायाभरणीच्या कामांची पाहणी करताना संरक्षक भिंत आणि उच्चदाब विद्युत वाहिनीसह अन्य अडथळे दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

संसाधनांचा योग्य वापर करण्याचे निर्देश
चारकोप येथे माइंडस्पेस ते कांदिवलीदरम्यान प्रत्येकी ३.९ किलोमीटर लांबीचे दुहेरी भूमिगत बोगदे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी ६५ मीटर लांब आणि ४० मीटर रुंद क्षेत्रात लॉन्चिंग शाफ्टचे काम सुरू आहे. तसेच चारकोप ते गोराईदरम्यान ३.७८ किलोमीटर लांबीचा मार्ग विकसित केला जात आहे. सर्व कामांचे सूक्ष्म नियोजन करून मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि तांत्रिक संसाधनांचा योग्य वापर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com