आवाज दडपण्याचा प्रयत्न

आवाज दडपण्याचा प्रयत्न
Published on: 

आवाज दडपण्याचा प्रयत्न

पाेलिस कारवाई, समाजमाध्यमाच्या निर्बंधांवर विद्यार्थ्यांचा आक्षेप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेविरोधात तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांना लक्ष्य केले जात आहे, असा आराेप पुरोगामी विद्यार्थी संघटना, छात्रभारती आणि कार्टूनिस्ट्स कम्बाइनने केला आहे. पोलिस कारवाई आणि सोशल मीडिया खात्यांवरील निर्बंधांमुळे लोकशाहीतील असहमतीचा आवाज दडपला जात आहे, असा दावा या संघटनांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला.

पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या साम्या कोरडे, छात्रभारतीचे रोहित ढाले आणि एका नागरिकाला मुंबई पोलिसांकडून कथितरीत्या बेकायदा नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर अशा प्रकारची कारवाई होत असेल, तर ती त्यांच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे, असे संघटनांनी म्हटले आहे. या कथित नजरकैदेच्या घटनांची पारदर्शक चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

कार्टूनिस्ट्स कम्बाइनचे गौरव सर्जेराव आणि साम्या कोरडे यांच्या इन्स्टाग्राम खात्यांवर निर्बंध घालण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. राजकीय अभिव्यक्तीशी संबंधित खात्यांवर कारवाई करताना डिजिटल प्लॅटफॉर्मने त्यामागील कारणांबाबत पारदर्शकता राखणे आवश्यक असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. संबंधित खात्यांवरील कारवाईचे स्पष्ट कारण मेटाने द्यावे आणि त्याविरोधात प्रभावी अपीलची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

एसआयआर आणि मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील आंदोलने ही निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करण्याच्या नागरिकांच्या अधिकाराशी संबंधित असल्याचे या संघटनांनी म्हटले आहे. आंदोलकांना कथितरीत्या धमकावणे किंवा त्यांच्या अभिव्यक्तीच्या माध्यमांवर निर्बंध आणल्यास लोकशाही संस्थांबाबत अविश्वास वाढू शकतो, असा दावाही त्यांनी केला.
==
शांततापूर्ण आंदोलनांवरील कथित पोलिस दडपशाही थांबवावी, विद्यार्थी व नागरिकांवरील पाळत आणि त्यांच्याशी होणाऱ्या वागणुकीबाबत उत्तरदायित्व निश्चित करावे. तसेच सोशल मीडिया खात्यांवरील निर्बंधांत पारदर्शकता आणावी. तसेच द्यार्थी संघटना, कलाकार, नागरी समाज आणि नागरिकांनी लोकशाहीतील असहमतीच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी एकत्र यावे.
- साम्या कोरडे, पुरोगामी विद्यार्थी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com