

विद्यार्थ्यांअभावी मराठी शाळांचे वर्ग बंद होणार!
परळमधील नवभारत तर भांडुपमधील मंदार विद्यामंदिर या शाळेचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : परळ आणि भांडुप येथील दोन मराठी माध्यमांच्या खासगी प्राथमिक अनुदानित शाळांचे इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग बंद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने शिक्षण समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. परळ येथील नवभारत विद्यामंदिरमध्ये २०१९-२० पासून, तर भांडुप येथील मंदार विद्यामंदिरमध्ये २०१६-१७ पासून विद्यार्थीसंख्या शून्य असल्याचे शिक्षण विभागाच्या नोंदीत नमूद आहे. शाळा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थीसंख्या नसल्याने वर्ग बंद करण्यासाठी कार्योत्तर मंजुरी मागविण्यात आली आहे.
परळमधील भोईवाडा परिसरातील सेंट झेविअर स्ट्रीट येथे दि बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळामार्फत नवभारत विद्यामंदिर ही शाळा चालविली जाते. १९९५पासून सुरू असलेल्या या शाळेला महापालिकेच्या शिक्षण समितीने वेळोवेळी मान्यता आणि अनुदानाची मुदतवाढ दिली होती. २०१६ मध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गांना कायम अनुदानित तत्त्वावर मान्यता वाढविण्यात आली होती, मात्र २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून चारही वर्गांमध्ये एकही विद्यार्थी नसल्याने हे वर्ग बंद करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. दुसरीकडे भांडुप पश्चिम येथील समर्थ नगर, शिवनेरी कंपाउंड परिसरातील मंदार विद्यामंदिर ही शाळा नवनाथ शिक्षण प्रसारक मंडळामार्फत १९८९ पासून चालविली जाते. या शाळेच्या पहिली ते चौथीच्या वर्गांना १९९० मध्ये प्रथम मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर शाळेला अनुदान आणि मान्यतेची मुदतवाढ मिळाली, मात्र २०१६-१७ पासून या शाळेतील विद्यार्थी संख्याही शून्य झाली. त्यामुळे शाळेचे वर्ग बंद करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.
कर्मचाऱ्यांचे अन्यत्र समायोजन
दोन्ही शाळांमधील विद्यार्थिसंख्या शून्य झाल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांचे अन्य शाळा आणि शिक्षण विभागाच्या कार्यालयांमध्ये समायोजन करण्यात आले आहे. नवभारत विद्यामंदिरमधील चार सहाय्यक शिक्षक, एक लिपिक आणि एका शिपायाचे समायोजन करण्यात आले आहे, तर मंदार विद्यामंदिरमधील दोन सहाय्यक शिक्षक, एक लिपिक आणि एका शिपायाला अन्य शाळांमध्ये सामावून घेण्यात आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन समायोजित केलेल्या शाळांमधून दिले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.