टायगर श्रॉफ गोळीबारादरम्यान व्लॉगरच्या छातीत गोळी

टायगर श्रॉफ गोळीबारादरम्यान व्लॉगरच्या छातीत गोळी
Published on: 

टायगर श्रॉफ गोळीबारादरम्यान व्लॉगरच्या छातीत गोळी
गर्भवती पत्नी आणि चिमुकल्याच्या भविष्याची चिंता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबारादरम्यान उमेश चौहान या ब्लॉगरच्या छातीत गोळी लागली. चित्रीकरण करताना त्याला गोळ्या लागल्या. उमेशवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे, मात्र आठ महिन्यांची गर्भवती पत्नी आणि सहा वर्षांचा मुलगा असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता त्याला सतावत आहे.
उमेश चौहान हा टायगर श्रॉफचे चाहता असून, दर रविवारी इतर व्लॉगर्ससोबत बॉलीवूड कलाकारांचे व्हिडिओ चित्रित करण्यासाठी जातो, रविवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता फुटबॉल खेळून टायगर श्रॉफ आपल्या गाडीकडे जात असताना चौहान गाडीजवळ उभा होता. त्या वेळी अभिनेत्याने चाहत्यांशी संवाद साधला. अचानक मोठा आवाज झाला. सुरुवातीला गाडीचा टायर फुटल्याचे त्याला वाटले; मात्र त्याच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. ‘माझ्या छातीत दुखत होते आणि श्वास घेता येत नव्हता. मी लोकांकडे मदत मागत होतो, मात्र मला गोळी लागली आहे, हे समजले नाही. कूपर रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी मला ही माहिती दिली,’ असे चौहान याने सांगितले. ‘मी पुन्हा कामावर कधी परतू शकेन, हे माहीत नाही. पत्नीची प्रसूती जवळ आली आहे. लवकर बरे होऊन पुन्हा काम सुरू करायचे आहे, जेणेकरून कुटुंबाची काळजी घेता येईल,’ असेही त्याने सांगितले.

टायगर श्रॉफच्या आईकडून मदतीचे आश्वासन
चौहान याचे मित्र, शेजारी आणि नातेवाईक त्यांना मदत करत आहेत. त्याचे मित्र अरुण गौड यांनी रुग्णालयातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कुटुंबाला सहकार्य केले. गौड यांच्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ यांच्या आईने मंगळवारी रुग्णालयात चौहान याची भेट घेतली. ‘त्यांनी संपूर्ण कुटुंब आमच्या पाठीशी असल्याचे सांगितले आणि माझा संपर्क क्रमांक घेतला, मात्र आर्थिक मदतीबाबत अद्याप स्पष्ट आश्वासन मिळालेले नाही. माझे काम बंद असल्याने आणि बचत मर्यादित असल्याने चिंता आहे,’ असे चौहान म्हणाला.

बुधवारी होणार शस्त्रक्रिया
केईएम रुग्णालयाच्या हृदय शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. उदय जाधव यांनी सांगितले की, ‘गोळीमुळे चौहान याच्या यकृताला आणि फुप्फुसांना दुखापत झाली आहे, मात्र गोळी फुप्फुसांना थोडक्यात चुकवून छातीच्या भिंतीत अडकली आहे. रक्तस्रावावर नियंत्रण ठेवण्यासाठी छातीत नळी बसवण्यात आली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सोनोग्राफीच्या मदतीने गोळीचे स्थान निश्चित करून ती शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात येईल. या प्रक्रियेला ३० मिनिटे ते एक तास लागू शकतो. गोळी न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. सध्या डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com