

दसऱ्याला मुंबईकरांची दुचाकी खरेदीला पसंती
दुचाकींच्या नोंदणीत ३.८ टक्के वाढ; चारचाकींची नोंदणी १०.७ टक्क्यांनी घटली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : नवरात्र आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी वाहन खरेदीला पसंती दिली; मात्र यंदा चारचाकींच्या तुलनेत दुचाकी खरेदीचा उत्साह अधिक असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली या चार आरटीओंमध्ये यंदा सात हजार ८७० दुचाकींची नोंदणी झाली. गेल्या वर्षी ही संख्या सात हजार ५७९ होती. त्यामुळे दुचाकींच्या नोंदणीत २९१ वाहनांची म्हणजेच ३.८ टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे, चारचाकींची नोंदणी दोन हजार ९६२ वरून दोन हजार ६४४ वर घसरली. यात १०.७ टक्के घट झाली.
दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन वाहन घरी आणण्यासाठी अनेक ग्राहकांनी आधीच बुकिंग केले होते. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांतील वाहनविक्रेत्यांच्या दालनांत ग्राहकांची गर्दी दिसून आली. वेळेत वाहनांचा ताबा देण्यासाठी वितरकांनी अतिरिक्त कर्मचारी तैनात करून नोंदणीची विशेष व्यवस्था केली होती. अंधेरी आरटीओमध्ये दुचाकींची नोंदणी एक हजार २८५ वरून एक हजार ४६५ झाली. वडाळ्यात एक हजार ६८७ वरून दोन हजार १४६, तर ताडदेवमध्ये दोन हजार २४३ वरून दोन हजार ३९९ नोंदणी झाली, मात्र बोरिवलीत दुचाकींची नोंदणी दोन हजार ३६४ वरून एक हजार ८६० पर्यंत घसरली.
....
चारचाकींच्या नोंदणीत घट
चारचाकींच्या नोंदणीत ताडदेव आरटीओ वगळता अन्य तीन आरटीओंमध्ये घट झाली. ताडदेवमध्ये चारचाकींची नोंदणी ७३५ वरून ९२४ झाली. अंधेरीत ५५४ वरून ५२१, वडाळ्यात ७२३ वरून ५५५, तर बोरिवलीत ८५० वरून ६४४ नोंदणी झाली. आता दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे वाहन उद्योगाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.