

प्रदूषण रोखण्याचे आव्हान कायम!
८७ बेकऱ्यांची धुराडी धगधगतीच; महापालिकेकडून कारवाईचे संकेत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबईतील वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेकऱ्यांमधील लाकूड आणि कोळशाचा वापर बंद करून स्वच्छ इंधनाचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे, मात्र मुंबईतील ५८३ परवानाधारक बेकऱ्यांपैकी ८७ बेकऱ्यांनी अद्याप स्वच्छ इंधनाचा वापर सुरू केलेला नाही. पाच बेकऱ्या बंद झाल्या असून, उर्वरित बेकऱ्यांनी तातडीने स्वच्छ इंधनाकडे वळावे, असे निर्देश महापालिकेने दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेकऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून, विनापरवाना सुरू असलेल्या आणि लाकूड जाळणाऱ्या बेकऱ्यांवरही महापालिकेची नजर राहणार आहे.
मुंबईतील वायुप्रदूषणाच्या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयाने बेकऱ्यांमधील पारंपरिक इंधनाच्या वापराबाबत कठोर भूमिका घेतली आहे. जानेवारी २०२५ मध्ये वायुप्रदूषणासंदर्भातील जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने बेकरीचालकांना सहा महिन्यांत स्वच्छ इंधनाकडे वळण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार लाकूड आणि कोळशाऐवजी एलपीजी, पाइपद्वारे पुरवठा होणारा नैसर्गिक वायू (पीएनजी) किंवा विजेचा वापर करणे आवश्यक आहे, मात्र इंधन बदलण्यासाठी अधिक मुदत मिळावी, अशी मागणी बेकरीचालकांनी केली होती. न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती.
न्यायालयाच्या निर्देशांनंतर महापालिकेने स्वच्छ इंधनाचा वापर न करणाऱ्या बेकऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. बेकरीचालकांना इंधन बदलण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन मिळावे, यासाठी विशेष शिबिरही आयोजित करण्यात आले होते. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकीकरण योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा, याची माहिती देण्यात आली होती. असे असतानाही अद्याप ८७ बेकऱ्यांनी स्वच्छ इंधनाचा वापर सुरू केलेला नसल्याने महापालिकेकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, स्वच्छ इंधनाचा वापर न करणाऱ्या बेकऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या प्रक्रियेत महापालिकेचा आरोग्य विभाग आणि अग्निशमन दल महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे उर्वरित बेकऱ्या स्वच्छ इंधनाकडे कधी वळतात आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिका नेमकी कोणती कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.
प्रदूषणात बेकऱ्यांचा ३.५ टक्के वाटा
मुंबईतील पीएम १० या सूक्ष्म धूलिकणांच्या प्रदूषणात बेकऱ्यांचा वाटा सुमारे ३.५ टक्के असल्याचे सांगितले जाते. बॉम्बे एन्व्हायर्नमेंट ॲक्शन ग्रुपच्या अभ्यासानुसार, काही बेकऱ्यांमध्ये जुन्या फर्निचरमधून मिळणारे टाकाऊ लाकूड जाळले जाते. अशा लाकडाच्या ज्वलनातून हानिकारक अस्थिर सेंद्रिय संयुगे बाहेर पडू शकतात. त्यामुळे श्वसनविकारांचा धोका वाढण्यासोबतच धुरके आणि जमिनीलगतच्या ओझोनच्या निर्मितीलाही हातभार लागू शकतो. त्यामुळे बेकऱ्यांमधील इंधन बदलाला प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे.
खर्च वाढल्याने बेकरीचालक अडचणीत
दुसरीकडे, स्वच्छ इंधनाचा वापर सुरू केलेल्या बेकरीचालकांना वाढत्या इंधन दरांमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्याने मासिक इंधन खर्च तिप्पट झाल्याचे भायखळा येथील बेकरीचालक मिर्झा गयासुद्दीन बेग यांनी सांगितले. इंधन बदलण्यासाठी सुमारे २० लाख रुपये खर्च करावे लागल्याचेही त्यांनी नमूद केले. स्वच्छ इंधनाचा वापर करणे आवश्यक असले, तरी त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. परिणामी, स्वच्छ इंधन वापरणाऱ्या बेकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी इंधनावर अनुदान द्यावे, अशी मागणी बेकरीचालकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.