

४९ लाखांचे दागिने चोरणाऱ्याला अटक
३५८ ग्रॅम सोन्याचे दागिन्यासह मोबाईल हस्तगत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : गणपतीसाठी गावी जाऊन मुंबईला परतणारे कुटुंब रेल्वे प्रवासात झोपले असताना चोरट्याने त्यांच्या पर्समधील ४९ लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने आणि दोन मोबाईल चोरले. या गुन्ह्याचा तपास करत विशेष कृती दल (एसटीएफ) आणि लोहमार्ग गुन्हे शाखेच्या नेरूळ युनिटने मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातून कृष्णाकुमार रामाश्रय पांडे (वय ४०) याला अटक केली. त्याच्याकडून ४८ लाख ३० हजार ७९० रुपये किमतीचे ३५८.६७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध यापूर्वीही चार गुन्हे दाखल आहेत.
बोरिवली येथे राहणारे ६२ वर्षीय रंजित चव्हाण हे कुटुंबासह गणपतीसाठी चिपळूण येथे गेले होते. ९ ऑक्टोबरला ते सावंतवाडी-सीएसएमटी एक्स्प्रेसने मुंबईला परतत होते. प्रवासादरम्यान त्यांची पत्नी रुपाली यांनी दागिने आणि दोन मोबाईल असलेली पर्स उशीखाली ठेवली होती. त्या झोपेत असताना पर्स चोरीला गेली. पनवेल स्थानकात जाग आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पनवेल रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. आरोपीचा माग काढत पोलिस ११ ऑक्टोबरला पथक मध्य प्रदेशात रवाना झाले. स्थानिक नागौद पोलिसांच्या मदतीने १३ ऑक्टोबरला हरदुवा मोहल्ला परिसरातून पांडे याला ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पांडे याच्याविरुद्ध कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात एक, तर रत्नागिरी आणि रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यांत मिळून तीन गुन्हे दाखल आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.