

मुंबईत तीन उड्डाणपुलांचे आज लोकार्पण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या शीव, विद्याविहार आणि गोरेगाव-मुलुंड जोडमार्गावरील तीन उड्डाणपुलांचे लोकार्पण गुरुवारी (ता. २२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १ वाजता दृकश्राव्य माध्यमातून हा कार्यक्रम होईल. महापौर रितू तावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
शीव रेल्वे स्थानकाजवळील ११२ वर्षे जुना पूल असुरक्षित ठरल्याने त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्ला यादरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांच्या विस्तारासाठीही हा पूल महत्त्वाचा आहे. नवीन पुलामुळे रेल्वे मार्गिकांच्या विस्तारातील अडथळा दूर होण्यास मदत होणार आहे. या पुलाचे काम फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते, मात्र विविध अडचणींवर मात करून हे काम चार महिने आधी पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च रेल्वे विभागाने केला आहे. विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडतो. या पुलामुळे विद्याविहार ते घाटकोपरदरम्यानचा प्रवासाचा वेळ ३० मिनिटांवरून १० मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच घाटकोपर स्थानकाजवळील उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल.
वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत
गोरेगाव पूर्वेतील रत्नागिरी हॉटेल जंक्शनजवळ गोरेगाव-मुलुंड जोडमार्गांतर्गत १.२६ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग ते संतोषनगर परिसरातील दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गापर्यंतची जोडणी यामुळे सुलभ होणार आहे. या पुलामुळे गोरेगाव पूर्व, दिंडोशी न्यायालय आणि लगतच्या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.