मुदत ठेवींच्या चर्चेत पक्षांतरावरून खडाजंगी!

मुदत ठेवींच्या चर्चेत पक्षांतरावरून खडाजंगी!
Published on: 

मुदत ठेवींच्या चर्चेत पक्षांतरावरून खडाजंगी!
‘तुम्ही आमच्याकडे या’ टोमण्याने वादाला तोंड

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत बुधवारी (ता. २१) मुदत ठेवींवरील चर्चेदरम्यान पक्षांतराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गटाच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. ‘तुम्ही आमच्याकडे या’ या सत्ताधारी सदस्याच्या टोमण्यामुळे सुरू झालेल्या वादात दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी पक्षांतरामागील कारणांवरून एकमेकांना सुनावले. अखेर समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना हस्तक्षेप करून हा विषय थांबवावा लागला. दरम्यान, महापालिकेच्या मुदत ठेवींचा हिशेब देण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली.

मुदत ठेवींवरील चर्चेदरम्यान शिवसेना ठाकरे सेनेच्या लक्ष्मी भाटिया यांनी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना पुरेसा निधी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या प्रीती सातम यांनी ‘तुम्ही आमच्याकडे या,’ असा टोला लगावला. यामुळे संतप्त झालेल्या भाटिया यांनी ‘इकडे-तिकडे जाण्याची आम्हाला सवय नाही,’ असे सुनावले. त्यानंतर शिंदे सेनेच्या यामिनी जाधव यांनी पक्ष सोडण्यामागील कारणांचा दाखला देत पक्षप्रमुखांकडे कैफियत मांडूनही प्रतिसाद मिळाला नसल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगितले. समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनीही आपण काही कारणांमुळे पक्ष सोडल्याचे सांगत ‘मीही काही गोष्टी भोगल्या आहेत. त्यामुळे या विषयावरील चर्चा बंद करा,’ असे सदस्यांना बजावले. या वेळी त्यांनी पूर्वीच्या सत्ताकाळात विरोधकांना केवळ ११ टक्के, तर सत्ताधाऱ्यांना ८९ टक्के निधी दिला जात असल्याचा आरोप करीत ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले.

१३,७७५ कोटींच्या हिशेबाची मागणी
महापालिकेने प्रशासकाच्या काळापासून आतापर्यंत १३,७७५ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी मोडल्याचा दावा काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी केला. या निधीचा वापर कुठे आणि कसा झाला याबाबत श्वेतपत्रिका काढून माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. उद्यानांच्या कामांसाठी ९१ कोटी रुपये शिल्लक असतानाही नगरसेवकांना निधी नसल्याचे सांगितले जात असल्याचा आरोप यशोधर फणसे यांनी केला. श्रद्धा जाधव यांनीही मुदत ठेवींचे अहवाल वेळेत सादर करण्याची मागणी केली. महापालिकेच्या विविध बँकांमध्ये सध्या ७९,८७३ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी असल्याची माहिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिली. मुदत ठेवींचे तिमाही अहवाल नियमितपणे सादर करावेत, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com