

मध्यवर रविवारी; पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री ब्लॉक
माटुंगा-मुलुंड जलद मार्गासह कुर्ला-वाशी हार्बर मार्गावर ब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. २५) मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर हा ब्लॉक असेल. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
कुठे : माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल संबंधित स्थानकांवर थांबतील. ठाण्यापुढे जलद मार्गावर धावणाऱ्या लोकल मुलुंड येथे पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
तसेच, ठाण्याहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड ते माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल संबंधित स्थानकांवर थांबतील. पुढे माटुंगा येथे त्या पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. परिणामी, या लोकल गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
हार्बर मार्ग
कुठे : कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटीहून पनवेल, बेलापूर आणि वाशीकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल, तसेच पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसएमटीकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द राहतील. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी यादरम्यान विशेष उपनगरी लोकल चालवण्यात येतील. या काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे ते वाशी/नेरूळदरम्यान प्रवास करण्याची परवानगी असेल.
पश्चिम रेल्वे
कुठे : सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : शनिवारी मध्यरात्री १२.३० ते रविवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान पश्चिम रेल्वेवरील सर्व जलद लोकल सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच काही लोकल रद्द करण्यात येतील. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नसेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.