मुंबईत उभारणार जागतिक दर्जाची मरीना

मुंबईत उभारणार जागतिक दर्जाची मरीना
Published on: 

मुंबईत उभारणार जागतिक दर्जाचे मरीना
विक्टोरिया डॉक येथे ९२३ कोटींचा प्रकल्प

मुंबई, ता. २४ : मुंबईत जागतिक दर्जाचे मरीना उभारण्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने (एमपीए) जागतिक निविदा प्रसिद्ध केली आहे. विक्टोरिया डॉक येथे ‘विकसित भारत मुंबई मरीना’ हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ९२३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. इच्छुक कंपन्यांना १५ डिसेंबर २०२६ पर्यंत निविदा सादर करता येणार आहेत.


मरीना प्रकल्पामुळे मुंबईतील समुद्री पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प बांधा, वित्तपुरवठा करा, चालवा आणि हस्तांतरित करा (डीबीएफओटी) या तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ४५ वर्षांची कंत्राट मुदत निश्चित करण्यात आली आहे. निवड झालेल्या कंपनीकडे प्रकल्पाची उभारणी, संचालन आणि देखभालीची जबाबदारी असेल. कंत्राटाची मुदत संपल्यानंतर प्रकल्पातील मालमत्ता मुंबई बंदर प्राधिकरणाकडे हस्तांतरित केली जाईल. या प्रकल्पांतर्गत ३७.३ हेक्टर क्षेत्रफळाचे संरक्षित जलक्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. संपूर्ण मरीनामध्ये ६०४ नौका उभ्या करण्याची क्षमता असेल. पहिल्या टप्प्यात ४२४ बर्थ उभारण्याचे नियोजन आहे. या सुविधांमुळे नौका उभ्या करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होण्याबरोबरच नौकाविहार आणि समुद्री पर्यटनाला चालना मिळेल. प्रकल्पात मरीना टर्मिनल, नौकाविहार प्रशिक्षण संस्था, नौका क्लब, इंधन केंद्र आणि नौका दुरुस्ती केंद्र उभारण्यात येणार आहे. याशिवाय पंचतारांकित हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटन व्यवसाय केंद्र आणि किरकोळ व्यापारासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नौकांच्या प्रदर्शनासाठीही सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे समुद्री पर्यटनाशी संबंधित विविध व्यवसायांना संधी मिळणार आहे.

सुरक्षिततेला प्राधान्य
मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगामुथु यांनी या प्रकल्पामुळे समुद्री पर्यटन आणि किनारपट्टी विकासाला प्रोत्साहन मिळेल, असे सांगितले. प्रकल्पाची उभारणी करताना बंदराचे नियमित कामकाज सुरळीत राहील आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com