हवेतील धूलिकणांवर आता नियंत्रण केंद्रांची नजर

हवेतील धूलिकणांवर आता नियंत्रण केंद्रांची नजर
Published on: 

हवेतील धूलिकणांवर आता नियंत्रण केंद्रांची नजर
प्रदूषणाचे हॉटस्पॉट निश्चित करून तातडीने उपाययोजना करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने हवेच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक मोजण्यासाठी सध्या २९ यंत्रे कार्यान्वित असून, या यंत्रांमधून मिळणाऱ्या माहितीचे विश्लेषण आणि प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांमध्ये समन्वय साधण्यासाठी पाच नियंत्रण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यापैकी तीन केंद्रांसाठी जागा निश्चित झाली असून, उर्वरित दोन केंद्रांसाठी जागेचा शोध सुरू आहे.
मुंबईतील बांधकामे, वाढती वाहतूक आणि धूलिकणांमुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर पीएम २.५ आणि पीएम १० या सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण मोजणाऱ्या यंत्रांमधून मिळणाऱ्या आकडेवारीचे नियंत्रण केंद्रांमध्ये विश्लेषण केले जाणार आहे. एखाद्या परिसरातील प्रदूषण वाढल्याचे निदर्शनास आल्यास तो भाग प्रदूषणाचा केंद्रबिंदू म्हणून निश्चित करून तेथे तातडीने उपाययोजना करणे शक्य होईल. पाणी फवारणी पथके, स्प्रिंकलर्स आणि धूळ नियंत्रण वाहनांना संबंधित भागात पाठविण्यासाठीही या केंद्रांची मदत होणार आहे.
दरम्यान, रेडी-मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणावरून महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारांची विभागणी स्पष्ट करण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत आरएमसी प्रकल्पांवर कारवाई करण्याचे अधिकार प्रामुख्याने मंडळाकडे आहेत, मात्र अनधिकृत किंवा नियमबाह्य बांधकामांविरोधात महापालिकेला संबंधित कायद्यांनुसार कारवाई करता येणार आहे.

नियमांची कडक अंमलबजावणी
पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनीही आरएमसी प्रकल्पांसाठी कडक नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यांवर धूळ पसरणार नाही, याची दक्षता घेण्याबरोबरच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com