औषध विक्रीला चाप!

औषध विक्रीला चाप!
Published on: 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २५ : औषधांच्या गुणवत्तेतील त्रुटी आणि विनापरवाना उत्पादनाविरोधात अन्न व औषध प्रशासनाच्या औषध विभागाने धडक कारवाई केली आहे. ५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान राज्यातील सातही विभागांत ९३७ तपासण्या करून ४५० नोटिसा बजावण्यात आल्या. या मोहिमेत २९ परवाने रद्द, तर ७१ परवाने निलंबित करण्यात आले. प्रयोगशाळांमध्ये तपासलेल्या २७९ औषध नमुन्यांपैकी २१ नमुने गुणवत्तेच्या निकषांवर अपयशी ठरले. विनापरवाना औषधविक्री आणि सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनाविरोधातील पाच कारवायांत २८ लाख ५२ हजार ३०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

एकूण तपासण्यांपैकी ८३२ तपासण्या औषधविक्रेत्यांच्या होत्या. त्रुटी आढळल्याने ३८२ नोटिसा बजावण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २२ विक्री परवाने रद्द, तर ४९ निलंबित करण्यात आले. औषधे, सौंदर्यप्रसाधने व वैद्यकीय उपकरणे उत्पादक, रक्तकेंद्रे आणि औषध चाचणी प्रयोगशाळांच्या १०५ तपासण्या झाल्या. या गटात ६८ नोटिसा बजावून सात परवाने रद्द आणि २२ निलंबित करण्यात आले.

बारामतीतील वेदास हर्बल्स येथून विनापरवाना उत्पादित साबणांचा चार लाख पाच हजार ६७८ रुपयांचा साठा, तर वसईतील जी. बी. कॉस्मेटिक्समधून नेलपॉलिश उत्पादन व पॅकिंगसंबंधी एक लाख ८३ हजार ९१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंगीकारक औषधाच्या ३४ गोळ्यांच्या बेकायदा व्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली.

२१ नमुन्यांत त्रुटी
मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील प्रयोगशाळांमध्ये २७९ नमुन्यांची चाचणी झाली. त्यापैकी २५८ नमुने गुणवत्तेच्या निकषांनुसार योग्य, तर २१ नमुने निकषांवर अपयशी ठरले. यामध्ये १८ कमी दर्जाची, दोन चुकीचे लेबल असलेली आणि एका बनावट औषधाचा समावेश आहे. मुंबईत ११९ पैकी १०, छत्रपती संभाजीनगरमध्ये १३३ पैकी सात, तर नागपूरमध्ये २७ पैकी चार नमुने निकषांवर अपयशी ठरले. औषधे बाजारातून परत मागवण्याच्या पाच प्रकरणांतही कार्यवाही झाली.

नागपुरात २२ लाखांचा साठा जप्त
नागपूरमधील फिनिक्स मेडिकॉर्प येथून २२ लाख तीन हजार ७४४ रुपये, तर जालना येथील नवजीवन मेडिकल अँड जनरल स्टोअर्समधून ५८ हजार ७७२ रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला. परवाने जमा केल्यानंतरही संबंधित ठिकाणी औषधसाठा ठेवून व्यवसाय सुरू असल्याचे आढळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com