टँकर माफियांच्या पाणीचोरीला लगाम

टँकर माफियांच्या पाणीचोरीला लगाम
Published on: 

टँकरमाफियांच्या पाणीचोरीला लगाम
गैरव्यवहार रोखण्यासाठी पालिकेची डिजिटल यंत्रणा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबईतील टँकर लॉबीच्या कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी आणि पाणी वितरणातील गैरव्यवहार रोखण्यासाठी महापालिकेने डिजिटल यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील ३३ हायड्रंटवर डिजिटल फ्लो मीटर बसविण्यात येणार असून, टँकरमध्ये नेमके किती पाणी भरले, याची अचूक नोंद ठेवली जाणार आहे. बुकिंगच्या नोंदी आणि प्रत्यक्ष पाणी वितरणाची पडताळणी शक्य होणार असल्याने पाणीचोरी आणि अनियमिततेला आळा घालण्यास मदत होणार आहे. यासंदर्भातील धोरण लवकरच स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केले जाणार आहे.
मुंबईतील अनेक सोसायट्या, उंच इमारती, हॉटेल व्यावसायिक आणि पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या वस्त्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, मात्र टँकर बुकिंग एका सोसायटीच्या नावाने करून प्रत्यक्षात दुसऱ्याच ठिकाणी पाणी वितरित केले जात असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या नोंदी आणि प्रत्यक्ष वितरण यामध्ये तफावत निर्माण होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या मालकीच्या टँकरच्या माध्यमातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.
हायड्रंटवर डिजिटल फ्लो मीटर बसवल्यानंतर टँकरमध्ये किती पाणी भरले, याची नोंद उपलब्ध होईल. ही माहिती नियंत्रण कक्षाला उपलब्ध करून देण्याची व्यवस्था प्रस्तावित आहे. त्यामुळे टँकरचे बुकिंग, भरलेल्या पाण्याचे प्रमाण आणि वितरणाच्या नोंदी यांची पडताळणी करणे शक्य होणार आहे. नोंदींमध्ये तफावत आढळल्यास संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करणेही सुलभ होईल. या व्यवस्थेमुळे पाणी वितरणात पारदर्शकता आणण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

स्वतंत्र धोरण तयार करणार
मुंबईतील उंचावरील वस्त्यांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तसेच उंच इमारती आणि हॉटेलमधील मागणीमुळे टँकरचा वापर वाढतो. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा योग्य वापर आणि वितरणावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. टँकर लॉबीच्या कारभाराला आळा घालण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले असून, ते लवकरच स्थायी समितीसमोर मांडले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com