

‘एआय’ने अग्निसुरक्षेला बळ!
संशयास्पद हालचालींची ओळख, संभाव्य धोक्यांचा वेळीच इशारा; संतोष वारिक यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः एआयच्या वापरामुळे सुरक्षा यंत्रणांमधील देखरेख आणि नियंत्रण अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या निरीक्षणामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास संशयास्पद हालचाली ओळखण्यासह संभाव्य धोके वेळीच लक्षात घेऊन तातडीने प्रतिसाद देणे शक्य होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचे संचालक व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संतोष वारिक यांनी केले. एआयमुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम, प्रभावी आणि सुसज्ज होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्स व अमेरिकन सोसायटी फॉर इंडस्ट्रियल सिक्युरिटी (एएसआयएस) यांच्या संयुक्त विद्यमाने एआय इन सिक्युरिटी संकल्पनेवर पीएसपी-एएसआयएस कॉन्क्लेव्हचे आयोजन केले होते. यामध्ये ‘अग्निसुरक्षेमध्ये एआयचा वापर’ यावर वारिक बोलत होते. मुंबईतील आयकॉनिका हॉटेल येथे झालेल्या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचे सहसंचालक किरण हत्याल, पीएसपीचे सहसंस्थापक सुनील बीडलम, मंगेश काटे, बँक ऑफ बडोदाच्या सुरक्षा विभागाचे राष्ट्रीय प्रमुख ब्रिगेडियर प्रीतपाल सिंग, सिक्युरिटी शेल्स इंफोटेकचे संचालक महेश गव्हाणे उपस्थित होते.
सरकारने ‘महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन अँड लाइफ सेफ्टी मेजर्स ॲक्ट’ मध्ये २०२३ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. इमारतीमध्ये आगीच्या सुरक्षेसाठी बसवलेले डिटेक्शन सिस्टीम्स, अलार्म, हायड्रंट्स आणि स्प्रिंकलर सेन्सर्सद्वारे आपत्कालीन स्थितीत अलर्ट पाठवले जातात. त्यामुळे कोणत्याही दुर्घटनेवेळी अग्निशमन दलाचा प्रतिसाद लवकर मिळण्यास मदत होईल, असे वारिक यांनी सांगितले.
गर्दीचे संपूर्ण व्यवस्थापन
संतोष वारिक म्हणाले, सद्यःस्थितीत इमारतींची सुरक्षा आणि आगीपासून बचाव या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या बनल्या आहेत. कारखाने, कार्यालये किंवा मॉलमध्ये लोकांच्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासह संपूर्ण व्यवस्थापन एआयच्या माध्यमातून करणे शक्य झाले आहे. तसेच, इमारतींमधील आगीच्या सुरक्षेच्या यंत्रणांवरही एआयद्वारे नजर ठेवता येणे सहज शक्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.