वर्सोवा-वांद्रे सेतूला २०२८ चा मुहूर्त

वर्सोवा-वांद्रे सेतूला २०२८ चा मुहूर्त
Published on: 

वर्सोवा-वांद्रे सेतूला २०२८चा मुहूर्त
कोविड, कंत्राटदारातील बदल, कामाच्या व्याप्तीमुळे विलंब
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पाचे काम १७ मे २०२८ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी प्रकल्पातील विलंब, कंत्राटदाराची जबाबदारी आणि लिक्विडेटेड डॅमेजेस आकारण्याबाबत तक्रार व निवेदन सादर केले होते. त्यावर उत्तर देताना महामंडळाने प्रकल्पाच्या सुधारित पूर्णत्वाच्या तारखेसह विलंबाची कारणे स्पष्ट केली आहेत.
वांद्रे-वर्सोवा सी लिंकच्या कामाला होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर अनिल गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून प्रकल्पातील विलंबाची कारणे, त्यासाठी जबाबदार असलेल्या घटकांची निश्चिती आणि कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईबाबत माहिती मागितली होती. त्यानुसार एमएसआरडीसीने प्रकल्पाचे काम मे २०२८ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान विलंबाची वेगवेगळी कारणे असली तरी प्रकल्प वेळेत पूर्ण करून मुंबईकराची वाहतूक कोंडीतून मुक्ती करावी, अशी मागणी अनिल गलगली यांनी केली आहे.

१,४२१ दिवसांची मुदतवाढ
वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पाच्या मूळ करारानुसार काम पूर्ण करण्याची तारीख २१ जून २०२४ होती. मात्र, प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान विविध कारणांमुळे १,४२१ दिवसांची मुदतवाढ मंजूर करण्यात आली असल्याचे एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे.

विलंबाची प्रमुख कारणे
सागरी सेतू प्रकल्पाच्या कामासाठी चार प्रमुख कारणांमुळे विलंब झाल्याचे एमएसआरडीसीने म्हटले आहे.
- स्टिंग यार्डसाठी जागा उपलब्ध होण्यास विलंब झाल्याने २५० दिवस.
- कोविड-१९ महामारी आणि टाळेबंदीमुळे १८० दिवस.
- जॉइंट व्हेंचरमधील पुनर्रचना व कायदेशीर बदलामुळे ४८३ दिवस.
- कामाच्या व्याप्तीतील बदलामुळे ५०८ दिवस. यामध्ये स्थानिक कोळी बांधवांच्या मागण्यांनुसार नेव्हिगेशन स्पॅन व आखणीतील बदल, मालाड येथील कास्टिंग यार्डचे स्थलांतर आणि अतिरिक्त जोडरस्त्यांचा समावेश आहे. या कारणांचा विचार करून तांत्रिक समिती आणि सल्लागारांच्या तपासणीनंतर मुदतवाढ मंजूर करण्यात आल्याचे एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com