एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी थकबाकीत

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी थकबाकीत
Published on: 

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी थकबाकीत
अर्थ खात्याकडून निधीला कात्री लावली जात असल्याचा श्रीरंग बरगे यांचा दावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता २६ : एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमा मिळत नसल्याने दिवाळीच्या तोंडावर विविध कर्मचारी संघटनांमध्ये नाराजी आहे. अर्थ खात्याकडून एसटी महामंडळाच्या निधीला सातत्याने कात्री लावली जात असल्याने महामंडळाची आर्थिक कोंडी झाल्याचा आरोप एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात एसटीचे उत्पन्न शून्यावर आले असतानाही तत्कालीन अर्थमंत्री दिवंगत अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही, मात्र विद्यमान अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणी करूनही एसटी महामंडळाला कधीच पूर्ण निधी दिला नाही.
कोरोना महामारीमुळे एसटीची वाहतूक ठप्प झाली होती आणि उत्पन्न पूर्णपणे बंद झाले होते. अशा संकटाच्या काळातही तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ४,००० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता, मात्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी आल्यानंतर एसटीला मागणीनुसार कधीच पूर्ण निधी मिळालेला नाही, असे बरगे यांनी सांगितले.
नोव्हेंबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत वेतनासाठी महामंडळाला ५,९४४ कोटी रुपयांची गरज असताना शासनाकडून प्रत्यक्षात ४७६५ कोटी ८५ लाख रुपयेच मिळाल्याने सुमारे ११७८ कोटी १५ लाख रुपयांचा निधी कमी पडल्याचा दावा बरगे यांनी केला. मागणी करूनही पूर्ण निधी मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या रकमांसाठी संघर्ष करावा लागत आहे, असे बरगे म्हणाले.
एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असताना तिच्या सेवकांच्या आर्थिक गरजांकडे दुर्लक्ष केले जात आहे. निधीअभावी कर्मचाऱ्यांच्या थकीत रक्कमा रखडणे हे योग्य नाही. भविष्यात हीच परिस्थिती राहिली तर सरकारला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही बरगे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com