डीडीएलजेच्या ऐतिहासिक यशाचा गौरव

डीडीएलजेच्या ऐतिहासिक यशाचा गौरव
Published on: 

मराठा मंदिरच्या ३१ वर्षांच्या चित्रपट प्रवासाची ‘वर्ल्ड रेकॉर्डस्’कडून दखल

मुंबई, ता. २६ : २० ऑक्टोबर १९९५ला मराठा मंदिरमध्ये प्रदर्शित झालेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. नुकतीच २० ऑक्टोबर २०२६ला या चित्रपटाने मराठा मंदिरमधील प्रदर्शनाची ३१ वर्षे पूर्ण केली. या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व चित्रपट प्रवासाची दखल घेत मराठा मंदिरचा ‘विनर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’च्या वतीने गौरव करण्यात आला.

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक असलेल्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (डीडीएलजे) आणि मुंबई सेंट्रलमधील मराठा मंदिर चित्रपटगृहाचे अनोखे नाते जगप्रसिद्ध आहे. अनेक पिढ्यांतील प्रेक्षकांना जोडून ठेवणारा हा चित्रपट ३१ वर्षांपासून मराठा मंदिर सिनेमागृहात अखंडपणे सुरू आहे. दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले. यशराज फिल्मने निर्मित केलेल्या या अजरामर प्रेमकथेत शाहरुख खान आणि काजोल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तीन दशकांहून अधिक काळ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान अजूनही कायम राखले आहे.

मराठा मंदिरमध्ये सुरू असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाने १२ डिसेंबर २०१४ला एक हजार आठवड्यांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला होता. त्यानंतरही चित्रपटाचे प्रदर्शन सुरू राहिल्याने मराठा मंदिरला भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक विशेष स्थान प्राप्त झाले आहे. हिंदी चित्रपटांचे निर्माते आणि मराठा मंदिर चित्रपटगृहाचे मालक मनोज देसाई यांना ‘विनर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’चा सन्मान प्रदान करण्यात आला. संस्थेच्या संचालिका, मिस इंडिया डॉ. ईशा अग्रवाल आणि अध्यक्ष डॉ. दीपक हरके यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.

समृद्ध परंपरेचे प्रतीक
या गौरवामुळे मराठा मंदिरच्या ऐतिहासिक योगदानाला आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’च्या दीर्घकालीन लोकप्रियतेला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. चित्रपट आणि चित्रपटगृह यांच्यातील हे अनोखे नाते भारतीय चित्रपटसृष्टीच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक ठरल्याची भावना चित्रपट रसिकांनी व्यक्त केली आहे.

मुंबई : मराठा मंदिरचा ‘विनर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’च्या वतीने गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com