

नऊ तास मध्य रेल्वेचा खोळंबा
लोकलमध्ये तासन्तास अडकले प्रवासी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : मध्य रेल्वेवरील लोकल सेवेचा सोमवारी (ता. २६) नऊ तास खोळंबा झाल्याने मुंबईकरांचे अक्षरशः हाल झाले. सकाळी कार्यालयासाठी घराबाहेर पडलेले प्रवासी गर्दीच्या डब्यांत तासन्तास अडकून पडले. डब्यांत असह्य उकाडा, पिण्याच्या पाण्याचा अभाव आणि श्वास घेण्यासही त्रास होत असल्याने प्रवाशांची घुसमट झाली. लोकलमधून उतरून पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही गर्दीचा सामना करावा लागला. ठाणे स्थानकात लोकलचा दरवाजा बंद ठेवल्याने झालेल्या गोंधळाने प्रवाशांच्या त्रासात आणखी भर घातली.
ठाणे-मुलुंडदरम्यान ओव्हरहेड वायरचा बिघाड आणि कांजूरमार्ग-भांडुपदरम्यान रिले रूमला आग लागल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली. लोकल उशिराने धावत असल्याने स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. डब्यांत जागा नसतानाही प्रवाशांना प्रवास करावा लागला. घामाने कपडे भिजले, पिण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हते आणि गर्दीतून बाहेर पडणेही कठीण झाले. दम्याचा त्रास असलेल्या प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाला, तर एका महिला प्रवाशाला चक्कर आल्याची माहिती सहप्रवाशांनी दिली.
पर्यायी मार्गानेही मनस्ताप
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित झाल्याने अनेक प्रवाशांनी ट्रान्स हार्बर मार्गाने वाशी आणि सानपाडा गाठले. तेथून हार्बर मार्गाने सीएसएमटीच्या दिशेने प्रवास केला, मात्र पर्यायी मार्गांवरही गर्दी वाढल्याने कार्यालय गाठण्यासाठी तीन ते चार तासांहून अधिक वेळ लागला. प्रवासाच्या मार्गात बदल करावा लागल्याने अनेकांची तारांबळ उडाली. बिघाडाबाबत पुरेशा घोषणा होत नसल्याने कोणत्या मार्गाने जावे, याबाबतही प्रवाशांमध्ये संभ्रम होता.
ठाण्यात बंद दरवाजामुळे गोंधळ
ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक २ वर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलचा दरवाजा काही प्रवाशांनी आतून बंद केल्याने गोंधळ झाला. दोन ते तीन मिनिटे दरवाजा उघडण्याची विनंती करूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या एका प्रवाशाने दरवाजावर पाणी फेकून निषेध व्यक्त केला. आधीच लोकलच्या खोळंब्यामुळे त्रस्त असलेल्या प्रवाशांना या प्रकाराचाही मनस्ताप सहन करावा लागला.
‘तीन तास डब्यात अडकलो’
ठाण्यातील नीलेश पाटील म्हणाले, ‘ठाणे ते कुर्ला २० मिनिटांचा प्रवास, पण आज तीन तास डब्यात अडकलो. डब्यात घामाने कपडे भिजले, पाणीही नव्हते. रेल्वेने आम्हाला जनावरांसारखे कोंडले.’ तर डोंबिवलीतील सीमा कदम यांनी सांगितले की, ‘मला दम्याचा त्रास आहे, गर्दीत श्वास घेता येत नव्हता. एक महिला तर चक्कर येऊन पडली. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने कोणतीही आपत्कालीन व्यवस्था ठेवली नव्हती. आमच्या जीवाशी खेळ का केला जातो.’
कार्यालय गाठण्यासाठी धडपड
पर्यायी मार्गाने प्रवास करताना तिकीट तपासनीसांच्या कारवाईचीही भीती प्रवाशांना वाटत होती. ‘ट्रान्स हार्बर आणि पुढे हार्बर मार्गाने प्रवास करताना टीसीची भीती वाटत होती, परंतु आज सोमवार असल्याने कार्यालयाला दांडी मारता येत नाही. सकाळी साडेनऊ वाजता ठाणे स्थानकात आलो होतो. त्यामुळे आता मागे बदलापूरला जाण्यापेक्षा कामावर जाण्याचा निर्णय घेतला,’ असे अमोल पाटील यांनी सांगितले.
नऊ तासांहून अधिक काळ लोकल विस्कळित राहते, प्रवासी गर्दीत तासन्तास अडकतात, तरी रेल्वे प्रशासनाला जाग येत नाही. प्रवाशांनी वेळेवर कामावर कसे पोहोचायचे आणि घरी कसे परतायचे, याचे नियोजन रेल्वेकडे आहे का, मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे.
- मनीषा गायकवाड, प्रवासी
डब्यात प्रचंड गर्दी, असह्य उकाडा आणि पिण्याच्या पाण्याचा अभाव असताना प्रवाशांना तासन्तास अडकवून ठेवणे कितपत योग्य आहे, दम्याचा त्रास असलेल्या प्रवाशांची अवस्था बिकट झाली, महिलांना त्रास सहन करावा लागला. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यावरच रेल्वे प्रशासनाला जाग येणार का?
- संदीप कराळे, प्रवासी
लोकल सेवा विस्कळित झाल्यानंतर प्रवाशांना दिलासा देण्याऐवजी त्यांना अधिक त्रास सहन करावा लागला, ठाणे स्थानकात डब्याचा दरवाजा बंद ठेवल्याने प्रवाशांचा संताप वाढला, रेल्वे प्रशासनाकडे बिघाड हाताळण्याचे नियोजन नाही का, रोज लाखो प्रवाशांकडून पैसे घेऊनही त्यांना सुरक्षित आणि सुसह्य प्रवास मिळत नसेल, तर जबाबदारी कोणाची?
- राहुल शार्दूल, प्रवासी
कर्मचारी विशेष लोकलचा दरवाजा बंद!
लोकलच्या विलंबामुळे फलाटांवर प्रवाशांची गर्दी उसळली असताना रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीची विशेष लोकलचे दरवाजे बंद करून चालविण्यात आली. ठाणे स्थानकात प्रवासी लोकलमध्ये चढण्यासाठी धडपडत असताना मोजक्या कर्मचाऱ्यांना घेऊन ही विशेष लोकल पुढे गेली. एका बाजूला सामान्य प्रवाशांची गर्दीतून वाट काढण्यासाठी धडपड सुरू असताना दुसरीकडे कर्मचारी विशेष लोकलचे दरवाजे बंद असल्याने रेल्वेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र लोकल
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी धावणारी विशेष लोकल परळ स्थानकातून सायंकाळी ४च्या सुमारास कल्याणच्या दिशेने रवाना होते. या लोकलमध्ये मोजके कर्मचारी प्रवास करत असताना सामान्य प्रवाशांना मात्र गर्दीच्या लोकलमध्ये चढण्यासाठी कसरत करावी लागत होती. अनेकांना गर्दीमुळे लोकलमध्ये प्रवेशही मिळत नव्हता. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळित झालेल्या दिवशी तरी या विशेष लोकलचा वापर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी करता आला असता, असा सवाल उपस्थित होत आहे.
गोंधळाच्या दिवशी तरी दिलासा द्या!
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र लोकल धावण्यास आमचा विरोध नाही, मात्र रेल्वे सेवा विस्कळित झाल्यानंतर सामान्य प्रवाशांचे हाल कमी करण्यासाठी प्रशासनाने उपलब्ध साधनांचा योग्य वापर करायला हवा. फलाटांवर प्रचंड गर्दी असताना कर्मचारी विशेष लोकलचे दरवाजे बंद ठेवण्याऐवजी परिस्थितीनुसार प्रवाशांना प्रवासाची मुभा दिली असती, तर गर्दीचा ताण काही प्रमाणात कमी झाला असता, अशी प्रतिक्रिया प्रवासी मिलिंद पाटील यांनी दिली.
नऊ तासांपेक्षा जास्त वेळ लोकल सेवा विस्कळित झाल्यामुळे प्रवाशांची गर्दी झाली. या गर्दीमुळे भांडुप आणि घाटकोपर रेल्वे स्थानकावर दोघा तरुणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हत्येचे गुन्हे दाखल करा व मयत तरुणांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करा.
- सुरेशचंद्र राजहंस, प्रवक्ते, मुंबई काँग्रेस
वाहनांच्या संख्येत २० ते ३० टक्क्यांची वाढ
मध्य रेल्वे लोकल सेवा विस्कळित झाल्याने कामावर जाणाऱ्या व परत घरी जाणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. रेल्वे सेवा ठप्प झाल्यामुळे अनेकांनी रस्ते मार्गाने जाणे पसंत केले, त्यामुळे सकाळी ठाणे-कल्याणवरून मुंबईला येणाऱ्या तर सायंकाळी मुंबईवरून ठाणे-कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या २० ते ३० टक्के वाढ झाली होती, अशी माहिती वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.