

उकाड्यात दिलासा देण्यासाठी पालिकेचे जुने एसी बदलणार
तीन वर्षांसाठी ४.६८ कोटींचे कंत्राट; रुग्णालये, कार्यालयांतील यंत्रणांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विविध मालमत्तांमधील जुन्या आणि नादुरुस्त वातानुकूलित यंत्रणा बदलण्यात येणार आहेत. पालिका कार्यालये, रुग्णालये, दवाखाने, प्रसूतिगृहे आणि नाट्यगृहांमध्ये नवीन एसी बसविण्यासह जुन्या यंत्रणा बदलण्यासाठी तीन वर्षांचे कंत्राट प्रस्तावित करण्यात आले आहे. या कामासाठी वस्तू व सेवा कर आणि पर्यवेक्षण शुल्कासह चार कोटी ६८ लाख ८४ हजार रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
पालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागामार्फत हे काम करण्यात येणार आहे. त्यामध्ये विंडो, स्प्लिट, कॅसेट आणि टॉवर प्रकारच्या वातानुकूलित यंत्रांचा समावेश आहे. विविध क्षमतेच्या जुन्या यंत्रणा बदलणे आणि आवश्यकतेनुसार नवीन यंत्रणा बसविणे, हा या कामाचा मुख्य उद्देश आहे. विशेषतः रुग्णालये आणि दवाखान्यांमधील वातानुकूलित यंत्रणा कार्यरत राहिल्याने रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
या कामासाठी १३ ऑगस्ट २०२६ रोजी ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये मेसर्स साई कुल सर्व्हिसेस या संस्थेने कार्यालयीन अंदाजापेक्षा २.५२ टक्के कमी दराने निविदा सादर केली. त्यामुळे या संस्थेची निविदा सर्वांत कमी दराची ठरली. जीएसटीसह कंत्राटाची किंमत चार कोटी २६ लाख रुपये असून, पर्यवेक्षण शुल्कासह एकूण अंदाजित खर्च ४.६८ कोटी रुपये आहे.
३६ महिन्यांसाठी कंत्राट
या कंत्राटाचा कालावधी ३६ महिने असणार आहे. प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी आणि संबंधित समितीची प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे. मंजुरीनंतर आवश्यकतेनुसार विविध ठिकाणच्या वातानुकूलित यंत्रणा बदलण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.