

विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात निकृष्ट तांदूळ
शिक्षण समितीत नमुने सादर; संबंधित संस्थांवर कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत दिल्या जाणाऱ्या खिचडीसाठीच्या तांदळाच्या गुणवत्तेचा आणि त्याच्या कथित बेकायदा अदलाबदलीचा गंभीर मुद्दा सोमवारी (ता. २६) शिक्षण समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. शिवसेनेच्या सदस्यांनी निकृष्ट तांदळाचे नमुने सादर करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तसेच, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या संस्थांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
शिवसेनेचे शिक्षण समिती सदस्य प्रियांक राऊत यांनी हरकतीचा मुद्दा मांडून प्रधानमंत्री शालेय पोषण आहार योजनेतील कथित अनियमिततेकडे लक्ष वेधले. शालेय पोषण आहारासाठी तांदळाची वाहतूक करणारे ट्रक मुंबईबाहेर अनेकदा पकडले जात असल्याचे सांगत त्यांनी तांदळाची बेकायदा अदलाबदल होत असल्याचा आरोप केला. यासंदर्भात दोन वर्षांपूर्वी दाखल झालेल्या एका एफआयआर प्रतही त्यांनी बैठकीत सादर केली.
अशा प्रकरणांमध्ये संबंधित संस्थांवर कारवाई करण्याऐवजी केवळ ट्रकचालकांवर कारवाई केली जात असल्याचा मुद्दा राऊत यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या तांदळाच्या गुणवत्तेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या वेळी निकृष्ट तांदळाचा नमुना शिक्षण समितीच्या अध्यक्षांकडे सादर करण्यात आला.
शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद सावंत यांनी तांदळाच्या कथित काळाबाजारप्रकरणी संबंधित संस्थांच्या मालकांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार का, असा सवाल केला. नगरसेविका पूजा महाडेश्वर यांनीही तांदळाच्या गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित केला. घरात कीड लागलेला तांदूळ कोणी खात नाही, मग तो विद्यार्थ्यांना कसा दिला जाऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. भाजपच्या नगरसेविका सुषमा सावंत यांनीही या हरकतीच्या मुद्द्याला पाठिंबा दिला. याप्रकरणी दाखल झालेल्या सर्व एफआयआरची पुन्हा चौकशी करावी आणि जुन्या कंत्राटदारांना हटवावे, अशी मागणी त्यांनी केली.
गुणवत्तेची चौकशी करणार
या प्रकरणाचा हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात आला आहे. शालेय पोषण आहारासाठी वितरित करण्यात येणाऱ्या तांदळाच्या गुणवत्तेची चौकशी करण्यात येणार असून, संबंधित संस्था आणि प्रकरणांची सविस्तर माहिती पुढील बैठकीत सादर केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत तसेच तांदळाच्या वाहतुकीतील कथित अनियमिततेबाबतच्या चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.