प्रवासाला विमा कवच

प्रवासाला विमा कवच
Published on: 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २७ : रेल्वेच्या आरक्षण केंद्रांवरून तिकीट काढणाऱ्या प्रवाशांनाही आता ऐच्छिक प्रवास विमा घेता येणार आहे. भारतीय रेल्वेने २७ ऑक्टोबरपासून ही सुविधा सुरू केली आहे. आतापर्यंत ‘आयआरसीटीसी’च्या माध्यमातून ऑनलाइन तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना उपलब्ध असलेला हा पर्याय आता प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) केंद्रांवरही उपलब्ध होणार आहे. अवघ्या ४५ पैशांच्या विमा शुल्कात प्रवाशांना १० लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळू शकणार आहे.

आरक्षण केंद्रावर आरक्षित तिकीट काढताना प्रवाशांना ऐच्छिक विमा घेता येईल. यासाठी मोबाईल क्रमांक देणे आणि विम्याचे शुल्क डिजिटल पद्धतीने भरणे आवश्यक आहे. विमा घेण्याचा निर्णय पूर्णपणे प्रवाशांच्या इच्छेवर अवलंबून असेल. आरक्षण केंद्रांवरील कर्मचारी प्रवाशांना विम्याचा पर्याय निवडण्यासाठी मदत करतील.

विविध परिस्थितींमध्ये विमा संरक्षण
रेल्वे अपघात किंवा अनुचित घटनेमुळे मृत्यू झाल्यास १० लाख रुपये, कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास १० लाख रुपये, तर कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व आल्यास ७.५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळेल. दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास दोन लाख रुपयांपर्यंतचा खर्च, तर मृतदेह वाहतुकीसाठी १० हजारांपर्यंतची रक्कम मिळण्याची तरतूद आहे.

मोबाईलवर मिळणार पॉलिसीचा तपशील
विम्याचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पॉलिसीचा तपशील पाठवला जाईल. या विमा योजनेसाठी ‘आयआरसीटीसी’च्या ई-तिकीट प्रवाशांना लागू असलेल्या अटी व शर्ती लागू राहतील. अत्यल्प शुल्कात उपलब्ध असलेल्या या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com