वायुप्रदूषणावर कारवाईचा बडगा

वायुप्रदूषणावर कारवाईचा बडगा
Published on: 

वायुप्रदूषणावर कारवाईचा बडगा
हयगय केल्यास आयुक्त अश्विनी भिडे यांचा कारवाईचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबईतील वायुप्रदूषण नियंत्रणासाठी बांधकामस्थळे आणि शहरातील रस्ते धूळमुक्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित विकसक व बांधकाम व्यावसायिकांची आहे. या कामात हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंगळवारी (ता.२७) दिले. शहरातील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेने जारी केलेल्या २८ मुद्द्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या फटाक्यांबाबतच्या निर्देशांची अंमलबजावणी आणि वायुप्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी महापालिका मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत भिडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या, वायू गुणवत्ता मापन केंद्रे आणि सेन्सर नियमितपणे कार्यरत ठेवावेत, यंत्रणा बंद असल्यास किंवा चुकीची आकडेवारी दर्शवत असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. बांधकामस्थळांवरील धूळ हवेत पसरणार नाही, यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि बांधकाम नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात दिसली पाहिजे, त्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून नियमित तपासणी करावी, असे निर्देश भिडे यांनी दिले. रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी आधुनिक यंत्रांचा वापर करावा आणि धूळ नियंत्रणासाठी विशेष स्वच्छता मोहिमा राबवाव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्या. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, उपआयुक्त प्रशांत गायकवाड, उपआयुक्त अविनाश काटे यांच्यासह परिमंडळीय सहआयुक्त, उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

फटाक्यांबाबत जनजागृती करा!
फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि आरोग्यावरील दुष्परिणाम रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशांचे सर्व प्रशासकीय विभागांनी काटेकोर पालन करावे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शाळा, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून उपक्रम राबवावेत. फटाक्यांच्या वापराबाबत लागू असलेल्या नियमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com