कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा
Published on: 

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा
१४ हजार ७४७ अधिसंख्य पदांची निर्मिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या राज्यातील १४ हजार ७४७ पात्र आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय मंगळवारी (ता. २७) जारी करण्यात आला. या निर्णयानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदांवर नियुक्ती देण्यात येणार आहे.

२५ जून २०२६ रोजी तांत्रिक खंड वगळून १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. ही नियुक्ती एकवेळची विशेष बाब म्हणून करण्यात येणार असून, शासन निर्णयातील अटी व शर्ती कर्मचाऱ्यांना लागू राहतील. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण, दुर्गम तसेच शहरी भागांत आरोग्यसेवा पुरविण्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. माता-बाल आरोग्य, लसीकरण, संसर्गजन्य रोग नियंत्रण आणि विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत हे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या दीर्घकालीन सेवेच्या पार्श्वभूमीवर शासनाने हा निर्णय घेतला आहे. अधिसंख्य पदांवर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित पदाची वेतनश्रेणी, मूळ वेतनासह महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता लागू राहणार आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या अनुज्ञेय असलेल्या रजांचा लाभ मिळेल, मात्र पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, सेवानिवृत्ती वेतन आणि कुटुंब निवृत्तिवेतन योजना या कर्मचाऱ्यांना लागू नसतील. शासन निर्णयानुसार ही पदे २५ जून २०२६ पासून अस्तित्वात येतील. पात्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची पुढील प्रक्रिया निश्चित केलेल्या अटी व शर्तींनुसार पूर्ण केली जाणार आहे.

सेवाविषयक व्यवस्थेत बदल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळ सेवा देणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक व्यवस्थेत बदल होणार असला, तरी नियुक्तीच्या अटींमुळे त्यांना मिळणाऱ्या लाभांचे स्वरूप मर्यादित राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com