एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन
Published on: 

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन
प्रतिपूर्तीपोटी ३९१.०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सप्टेंबरमधील प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ३९१.०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय मंगळवारी (ता. २७) जारी करण्यात आला.

एसटी महामंडळातील सुमारे ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांना साधारणतः दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान वेतन दिले जाते. यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होत असल्याने सणापूर्वी वेतन मिळावे, यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पाठपुरावा केला होता. वेतन वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. एसटी महामंडळाकडून महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिकांसह विविध प्रवासी सवलतींची अंमलबजावणी केली जाते. या सवलतींपोटी शासनाकडून महामंडळाला प्रतिपूर्ती दिली जाते. सप्टेंबर २०२६ मधील सवलतींच्या प्रतिपूर्तीसाठी ३९१.०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण वेतनासाठी सुमारे ५६० कोटी रुपये आवश्यक असल्याने मंजूर निधीतून केवळ निव्वळ वेतन देता येईल. भविष्य निर्वाह निधी (पीएफ), उपदान (ग्रॅच्युइटी) आणि इतर वैधानिक देयके देता येणार नाहीत, असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.


एसटी ही लाखो प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असून, अधिकारी आणि कर्मचारी हे महामंडळाचे खरे बळ आहेत. कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा, यासाठी त्यांना सणापूर्वी वेतन मिळणे आवश्यक आहे. शासनाने निधी मंजूर केला असून, आता एसटी प्रशासनाने वेतन वितरणाची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

संपूर्ण वेतनासाठी ५६० कोटी रुपये लागतात. एवढ्या कमी निधीतून केवळ निव्वळ वेतन दिले जाईल. पीएफ, ग्रॅच्युइटी आणि इतर वैधानिक देयके देता येणार नाहीत. सरकारने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com