

जिओचा पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना २६.६६ टक्के नफा
समभाग १,४१७.३५ रुपयांवर बंद; बाजारमूल्याच्या बाबतीत एअरटेललाही टाकले मागे
मुंबई, ता. २८ : बहुचर्चित आणि विक्रमी जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओने शेअर बाजारातील नोंदणीच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला. प्रति समभाग १,११९ रुपये या इश्यू किमतीने उपलब्ध झालेला जिओचा समभाग बीएसईवर १,४१७.३५ रुपयांवर बंद झाला. त्यामुळे, गुंतवणूकदारांना प्रत्येक समभागामागे २९८.३५ रुपये, म्हणजेच २६.६६ टक्के नफा मिळाला.
जिओच्या आयपीओमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या समभागांच्या तुलनेत सुमारे ३० पट अधिक मागणी नोंदवण्यात आली होती. त्यामुळे नोंदणीच्या पहिल्याच दिवशी हा समभाग किमान २० टक्के नफा देईल, असा अंदाज बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला. शेअर बाजारात जिओच्या समभागाचे व्यवहार १,३५८ रुपयांवर सुरू झाले. त्यानंतर काही काळात किंमत घसरून १,३५६ रुपयांवर आली. मात्र, दुपारनंतर समभागाच्या किमतीत वाढ झाली. त्याने १,४२३.८० रुपयांचा उच्चांक गाठला. दिवसअखेर बीएसईवर तो १,४१७.३५ रुपयांवर बंद झाला. भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी), हुंदाई मोटर, पेटीएम आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत जिओने नोंदणीच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना अधिक नफा मिळवून दिला.
दूरसंचार क्षेत्रातही अव्वल
जिओ प्लॅटफॉर्म्सचे शेअर बाजारातील नोंदणीच्या वेळीच भांडवली बाजारमूल्य १२.५१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. हा देखील एक विक्रम ठरला. नोंदणीपूर्वीच्या इश्यू किमतीनुसार जिओचे बाजारमूल्य १०.३० लाख कोटी रुपये, म्हणजेच १०८ अब्ज डॉलर होते. या मूल्यामुळे मेटा, अलिबाबा आणि स्पेसएक्स यांसारख्या जागतिक कंपन्यांच्या तुलनेत जिओची चर्चा झाली होती. दरम्यान, बाजारमूल्याच्या बाबतीत जिओने एअरटेललाही मागे टाकले. जिओचे बाजारमूल्य १२.६१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, तर एअरटेलचे बाजारमूल्य १२.१७ लाख कोटी रुपये होते. त्यामुळे जिओ देशातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली दूरसंचार कंपनी ठरली. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर जिओच्या समभागाचे दिवसभरात १७ कोटी ७३ लाख ३२ हजार १३८ व्यवहार झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.