

ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचे निधन
सामाजिक, कामगार चळवळीतही योगदान
मुंबई, ता. २८ : महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींचे अभ्यासू विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार आणि कामगार चळवळीतील कार्यकर्ते प्रताप आसबे यांचे बुधवारी (ता. २८) सायंकाळी हिंदुजा रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय पत्रकारितेतील एक अभ्यासू आवाज हरपला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रताप आसबे यांनी पत्रकारितेपूर्वी सामाजिक आणि कामगार चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनादरम्यान त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. ते युवक क्रांती दल आणि गिरणी कामगार सभेचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. कामगार आणि असंघटित शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यानंतर त्यांनी विविध दैनिकांत दीर्घकाळ पत्रकारिता केली. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे सखोल आकलन, सामाजिक प्रश्नांची जाण आणि निर्भीड व सडेतोड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये होती. राजकारण आणि समाजकारण यांचा परस्पर संबंध उलगडून दाखवताना त्यांनी सामान्य माणसांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवले. कामगार चळवळीतील अनुभव आणि राजकीय घडामोडींचा अभ्यास यांच्या आधारे त्यांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनावर भाष्य केले.
----
महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय पटाचा सखोल अभ्यास असणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. आसबे यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
......
विविध राजकीय आणि सामाजिक घडामोडींचे सूक्ष्म निरीक्षण व सखोल विश्लेषण हे त्यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राने एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
- सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री
......
आपल्या अभ्यासपूर्ण विश्लेषणातून आसबे यांनी महाराष्ट्राच्या पत्रकारितेत मोलाचे योगदान दिले. सामाजिक प्रश्नांवर आम्ही जाणकारांशी सुसंवाद साधायचो, त्यात प्रताप आसबे यांचा आवर्जून समावेश असायचा. त्यांची मते ते स्पष्टपणे मांडायचे.
- शरद पवार, ज्येष्ठ नेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.