

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बोनस रखडला!
तीन वर्षांचे सानुग्रह अनुदान देण्याची महापौरांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या रोजंदारी, बहुउद्देशीय आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना सलग तीन वर्षांचे दिवाळी सानुग्रह अनुदान मिळाले नसल्याचा दावा म्युनिसिपल मजदूर युनियनने केला आहे. २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या तीन आर्थिक वर्षांचे सानुग्रह अनुदान देण्याची मागणी युनियनने केली आहे. यासंदर्भात महापौर आणि महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप गोविंद नारकर यांनी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत केईएम, नायर, सायन, नायर डेंटल आणि लोकमान्य टिळक रुग्णालयांसह बोरीवली येथील संबंधित केंद्रांमध्ये रोजंदारी सफाई कामगार, बहुउद्देशीय कर्मचारी, परिचारिका आणि अन्य कंत्राटी कर्मचारी काम करतात. कायम कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह अनुदान मिळावे, अशी युनियनची मागणी आहे. २०२५-२६ या वर्षासाठी महापालिकेच्या कायम कर्मचाऱ्यांना ३२ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे, मात्र रोजंदारी सफाई कामगार, बहुउद्देशीय कर्मचारी, परिचारिका आणि अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत अद्याप लेखी आदेश काढण्यात आलेला नसल्याचे युनियनने म्हटले आहे. २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षांचे बोनस प्रस्ताव आरोग्य विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी उशिरा सादर केल्यामुळे त्यावर निर्णय झाला नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. युनियनच्या माहितीनुसार, रोजंदारी सफाई कामगार २००९-१० पासून, तर बहुउद्देशीय कामगार २०१६-१७ पासून महापालिकेच्या सेवेत कार्यरत आहेत. अनेक वर्षे सेवा देऊनही सानुग्रह अनुदान न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आणि असंतोष निर्माण झाल्याचे युनियनने नमूद केले आहे.
संबंधित कर्मचाऱ्यांना २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या तिन्ही वर्षांचे सानुग्रह अनुदान एका पगाराइतके देण्यात यावे. त्यासाठी तातडीने लेखी आदेश काढून मंजुरी द्यावी, अशी मागणी युनियनचे प्रदीप गोविंद नारकर यांनी केली आहे. यामुळे कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे रोजंदारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळून न्याय मिळेल, अशी अपेक्षा युनियनने व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.