ॲग्रीगेटर कंपन्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करा : मुख्यमंत्री

ॲग्रीगेटर कंपन्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करा : मुख्यमंत्री
Published on: 

ॲग्रीगेटर कंपन्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करा : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : ॲग्रीगेटर कंपन्यांच्या वाहनांची, चालकांची आणि त्यांच्या कामाचे तास याची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देणारा अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करावा. या प्लॅटफॉर्मला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विश्लेषणाची जोड देऊन वाहनांचे संचालन, चालकांची नियुक्ती, पार्किंगची व्यवस्था आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर प्रभावी नियंत्रण ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
महाराष्ट्र ॲग्रीगेटर नियमावली-२०२६ संदर्भात झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी ॲग्रीगेटर क्षेत्रातील वाढती वाहनसंख्या, स्वतंत्र टॅक्सीचालकांच्या समस्या, प्रवाशांची सुरक्षितता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रवास वाटपातील पारदर्शकता या मुद्द्यांचा वर्षा निवासस्थानी आढावा घेतला. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ॲग्रीगेटर कंपन्यांकडून चालविल्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची नोंदणी, त्यासाठी वापरले जाणारे पार्किंगचे ठिकाण, संबंधित चालकाची माहिती, वाहन चालविण्याचा परवाना, पोलिस पडताळणी आणि अन्य आवश्यक कागदपत्रांचा तपशील डिजिटल स्वरूपात उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, दिवसभरात वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये कोणता चालक कोणते वाहन चालवितो, याची अद्ययावत नोंद या प्रणालीत असावी. एखादी घटना घडल्यास संबंधित वाहन आणि चालकाची माहिती तातडीने उपलब्ध होईल, अशी सक्षम यंत्रणा उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
...
फडणवीस यांच्या सूचना
- ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये स्वतंत्र टॅक्सीचालक आणि मोठ्या फ्लीट कंपन्यांच्या वाहनांना प्रवास वाटप करताना समान संधी मिळते की नाही, याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे.
- प्रवास वाटपामध्ये भेदभाव होत असल्यास तो ओळखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
- राज्यातील ॲग्रीगेटर क्षेत्राचा विस्तार आणि प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी, सक्षम आणि गतिमान नियामक यंत्रणा विकसित करण्याची आवश्यकता आहे.
- स्वतंत्र टॅक्सीचालकांचे हित, प्रवाशांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेतील शिस्त यांचा समतोल राखण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रभावी नियंत्रण व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश फडणवीस यांनी परिवहन विभागाला दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com