

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : एसटी महामंडळाच्या सवलतधारक प्रवाशांना विविध सवलतींचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी राष्ट्रीय सामान्य वाहतूक कार्ड (एनसीएमसी) नोंदणीला गती देण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे. विशेषतः महिला प्रवाशांनी नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत एनसीएमसी कार्डची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासन निर्णयानुसार एसटी महामंडळातील सर्व सवलतधारक प्रवाशांना प्रवासभाड्यातील सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी एसटी आगार, बसस्थानके तसेच प्रवाशांच्या सोयीच्या ठिकाणी अधिकृत एजन्सीच्या माध्यमातून कार्ड नोंदणी व वितरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अधिकृत केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू असते.
महिला प्रवाशांना सवलतीचा लाभ घेण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी नोव्हेंबरअखेर कार्ड नोंदणी पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांपर्यंत ही सुविधा पोहोचविण्यासाठी पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालयांच्या माध्यमातून विशेष नोंदणी व वितरण शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समन्वय साधण्याचे निर्देश
शिबिरांच्या आयोजनासाठी संबंधित कार्यालयांनी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाशी किंवा आगार प्रतिनिधींशी संपर्क साधावा. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, गृहिणी तसेच नोकरदार महिलांसह सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंदणी सुलभ व्हावी, यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यंत्रणांनी सुविधा पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत
एसटी महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ पात्र प्रवाशांना कोणत्याही अडथळ्याविना मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळेत एनसीएमसी कार्डची नोंदणी करून घ्यावी, तसेच संबंधित यंत्रणांनी अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत ही सुविधा पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन महामंडळाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.