वंदे भारत स्लीपर मुंबईत दाखल!

वंदे भारत स्लीपर मुंबईत दाखल!
Published on: 

वंदे भारत स्लीपर मुंबईत दाखल!
१ नोव्हेंबरला उद्‍घाटन; मुंबई-बंगळूर वेळ वाचणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मुंबई ते बंगळूरदरम्यान धावणारी वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस गुरुवारी मुंबईत दाखल झाली. आधुनिक तंत्रज्ञान, आरामदायी शयनव्यवस्था आणि प्रवाशांसाठी उपलब्ध केलेल्या विविध सुविधांमुळे ही गाडी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी महत्त्वाची ठरणार आहे. येत्या १ नोव्हेंबरला गाडीचे उद्‍घाटन होणार असून, ३ नोव्हेंबरपासून नियमित सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. या गाडीमुळे मुंबई-बंगळूर प्रवासाचा कालावधी कमी होण्याची अपेक्षा आहे.
सध्या मुंबई ते बंगळूर रेल्वे प्रवासासाठी साधारण २४ तास लागतात. नव्या वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसमुळे हा प्रवास सुमारे १६ तासांत पूर्ण होऊ शकतो. या गाडीमध्ये एकूण १६ वातानुकूलित डबे असून, प्रवाशांसाठी ८२३ बर्थची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात तृतीय श्रेणी वातानुकूलितचे ११ डबे, द्वितीय श्रेणी वातानुकूलितचे चार डबे आणि प्रथम श्रेणी वातानुकूलितचा एक डबा आहे. प्रवाशांना मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज करता यावीत, यासाठी चार्जिंग पॉइंट देण्यात आले आहेत. वाचनासाठी स्वतंत्र दिवे, सामान ठेवण्यासाठी जागा आणि आधुनिक प्रकाशयोजना यांचाही समावेश आहे. प्रवाशांना गाडीतील माहिती मिळावी, यासाठी प्रवासी माहिती यंत्रणा उपलब्ध आहे. स्वयंचलित दरवाजांमुळे गाडीतील प्रवेश आणि बाहेर पडण्याची व्यवस्था अधिक आधुनिक करण्यात आली आहे.
...
टॉकबॅक यंत्रणेसह विशेष सुविधा
प्रवासादरम्यान आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रवाशांना रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधता यावा, यासाठी टॉकबॅक यंत्रणा देण्यात आली आहे. प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्यातील स्वतंत्र कुपेमध्ये सेवा मागवण्यासाठी स्वतंत्र बटणाची सुविधा आहे. दिव्यांग प्रवाशांच्या सोयीसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधांमुळे प्रवास अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
...
सुरक्षिततेवर भर
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अग्निसुरक्षा यंत्रणा आणि धूर ओळखणारी उपकरणे यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळावी यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
...
आठ मध्यवर्ती स्थानकांवर थांबा
या गाडीला कल्याण, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, यादगीर, रायचूर, गुंटकल आणि अनंतपूर या आठ मध्यवर्ती स्थानकांवर थांबा प्रस्तावित आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे गाडीचे प्रारंभिक स्थानक, तर बंगळूरमधील सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस हे अंतिम स्थानक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com