गरिबनगरमधील ९४ बांधकामांवर हातोडा

गरिबनगरमधील ९४ बांधकामांवर हातोडा
Published on: 

गरीबनगरमधील ९४ बांधकामांवर हातोडा
वांद्रे टर्मिनस विस्ताराचा मार्ग मोकळा; पायाभूत सुविधांचा विस्तार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : वांद्रे पूर्वेकडील गरीबनगर परिसरातील उर्वरित ९४ बांधकामे पाडण्याची कारवाई पश्चिम रेल्वेकडून शुक्रवारी (ता. ३०) हाती घेण्यात आली. दुपारपर्यंत ही सर्व ९४ बांधकामे हटविण्यात आली. यापूर्वी मे २०२६ मध्ये पश्चिम रेल्वेने मोठी निष्कासन मोहीम राबवली होती.
पात्र असलेल्या प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी ही ९४ बांधकामे राखून ठेवण्यात आली होती. आता एमएमआरडीएने या सर्व पात्र कुटुंबांना पर्यायी कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून दिली असून, त्यांचा ताबाही सोपवला आहे. त्यामुळे उर्वरित बांधकामे हटवून जागा मोकळी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वांद्रे टर्मिनसच्या पूर्वेकडील बाजूस महत्त्वाच्या पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने २३ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. संबंधित याचिका निकाली काढताना न्यायालयाने पात्र प्रकल्पबाधितांना एका आठवड्यात जागा रिकामी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर ४८ तासांच्या आत रेल्वे प्रशासनाने संबंधित बांधकामे पाडावीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानुसार पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पश्चिम रेल्वेने उर्वरित बांधकामे हटविली.

फलाट क्रमांक आठची उभारणी
गरीबनगरमधील जागा मोकळी झाल्याने वांद्रे टर्मिनसच्या पूर्वेकडील बाजूस एकात्मिक रेल्वे संकुल विकसित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या परिसरात आठव्या फलाटाची उभारणी करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर गाड्या उभ्या करण्याच्या सुविधांचा विस्तार, रेल्वे गाड्यांच्या देखभालीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी तसेच देखभालीशी संबंधित पूरक सुविधांचे स्थलांतर आणि विकास करण्यात येणार आहे.

प्रवासी सुविधांमध्ये वाढ
वांद्रे टर्मिनस परिसरात प्रवाशांची ये-जा अधिक सुलभ करण्यासाठी प्रवाशांच्या हालचालींसाठी स्वतंत्र जागा, थांबा क्षेत्र आणि इतर पूरक सुविधांचा विकास केला जाणार आहे. यामुळे प्रवाशांची गर्दी हाताळणे अधिक सोयीचे होईल. तसेच गाड्या उभ्या करण्याची आणि त्यांच्या देखभालीची क्षमता वाढल्याने रेल्वेच्या परिचालन व्यवस्थेलाही बळ मिळणार आहे.

एकात्मिक रेल्वे संकुलाचे नियोजन
वांद्रे परिसराचा केवळ रेल्वे टर्मिनस म्हणून नव्हे, तर उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीला पूरक अशा एकात्मिक रेल्वे संकुलाच्या स्वरूपात विकास करण्याचे पश्चिम रेल्वेचे नियोजन आहे. मोकळ्या झालेल्या जागेचा उपयोग करून विविध पायाभूत सुविधा प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहेत. यामुळे भविष्यात प्रवासी हाताळणी क्षमता वाढण्यासह प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

वांद्रे टर्मिनसच्या क्षमतेत वाढ
सध्या वांद्रे टर्मिनसमधून दररोज सुमारे २० लांब पल्ल्याच्या गाड्या चालविल्या जातात. प्रस्तावित विस्ताराची कामे पूर्ण झाल्यानंतर ही संख्या ३० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच सध्या दररोज सुमारे ६० हजार प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात. विस्तारानंतर आणखी ३० हजार प्रवाशांची भर पडून ही संख्या ९० हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

२४ डब्यांच्या गाड्यांसाठी फलाटांचा विस्तार
सध्या वांद्रे टर्मिनसवरील फलाटांवर १८ ते २२ डब्यांच्या गाड्या उभ्या राहू शकतात. भविष्यात २४ डब्यांच्या गाड्या चालविण्याच्या दृष्टीने फलाटांची लांबी वाढविण्याचे नियोजन आहे. याशिवाय स्थानक परिसरात १० अतिरिक्त उपमार्गिका विकसित करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.