

‘आयुष्मान’मधून गावोगावी आरोग्यसेवा!
तपासणी, गृहभेटी, टेलिमेडिसिन, तपासण्यांवर भर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना घराजवळच दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार बाह्यरुग्ण सेवा, गावभेटी, गृहभेटी, टेलिमेडिसिन, आजारांचे निदान आणि प्राथमिक उपचार नियमितपणे दिले जाणार आहेत.
नव्या वेळापत्रकानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या वेळेत बाह्यरुग्ण सेवा सुरू राहील. दुपारी २ ते ४ या वेळेत गावभेटी, सायंकाळी ४ ते ५ या वेळेत गृहभेटी, तर ५ ते ५.३० या वेळेत कामकाजाच्या नोंदी अद्ययावत केल्या जातील. शनिवारी सकाळी बाह्यरुग्ण सेवेसह ई-संजीवनी आणि टेलिमेडिसिन सेवांचे नियोजन करण्यात येईल. प्रत्येक समुदाय आरोग्य अधिकाऱ्याने दररोज किमान एका गावाला भेट देणे बंधनकारक करण्यात आले आहे. अंगणवाडी, शाळा किंवा ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्यसेवा दिली जाईल. गर्भवती व स्तनदा माता, लहान बालके तसेच विविध आजारांच्या रुग्णांना गृहभेटीद्वारे उपचार आणि पाठपुरावा केला जाणार आहे. केंद्रांमध्ये १४ प्रकारच्या प्रयोगशाळा तपासण्या, आवश्यक औषधे आणि प्राथमिक उपचारांची सुविधा उपलब्ध असेल. ई-संजीवनीच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्लाही मिळणार आहे. क्षयरोग, कुष्ठरोग, सिकलसेल, असंसर्गजन्य आजार, उच्च जोखमीच्या गर्भवती माता आणि नवजात बालकांच्या आरोग्य तपासणीवर विशेष भर दिला जाणार आहे. या सेवांच्या अंमलबजावणीवर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी दररोज, तालुका आरोग्य अधिकारी साप्ताहिक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी मासिक स्तरावर देखरेख ठेवतील. दर तीन महिन्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती आढावा घेणार आहे.
...
घराजवळ मोफत सेवा!
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘‘आयुष्मान आरोग्य मंदिरांमधील डे-केअर ओपीडी सेवेमुळे गरीब, गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांना घराजवळ मोफत आरोग्यसेवा मिळेल. दूरवर जाण्याची गरज कमी होऊन वेळेची बचत होईल. गावोगावी आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या या निर्णयामुळे जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.