‘इम्युनिटी’सह नाट्यसंहितांचा गौरव

‘इम्युनिटी’सह नाट्यसंहितांचा गौरव
Published on: 

‘इम्युनिटी’सह इतर नाट्यसंहितांचा गौरव
राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील नाट्यलेखन पारितोषिके जाहीर

मुंबई, ता. ३० : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने आयोजित ६४व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील नवीन नाट्यसंहितांचे परीक्षण करण्यात आले असून, उत्कृष्ट नाट्यलेखनासाठी नाट्यलेखकांना पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.

प्राथमिक फेरीतील नवीन नाट्यसंहितांच्या परीक्षणानंतर ‘इम्युनिटी (द व्हॉईस ऑफ टॉलरन्स)’ या नाट्यसंहितेसाठी डॉ. सोमनाथ सोनवलकर यांना प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले. ‘लुई दागेरी ते पिकासो’ या नाट्यसंहितेसाठी डॉ. श्याम शिंदे यांना द्वितीय, तर ‘मिसेस हिटलर’ या नाट्यसंहितेसाठी रोहन टिल्लू यांना तृतीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. नवीन नाट्यसंहितांच्या माध्यमातून समकालीन विषय, सामाजिक वास्तव आणि विविध मानवी पैलू रंगभूमीवर प्रभावीपणे मांडले जातात. अशा नाट्यलेखनाची दखल घेऊन नाट्यलेखकांच्या सर्जनशील योगदानाचा गौरव करणे हा या पारितोषिकांचा प्रमुख उद्देश आहे. या पारितोषिकांमुळे नाट्यलेखकांना प्रोत्साहन मिळून मराठी रंगभूमीसाठी दर्जेदार आणि आशयपूर्ण नवीन नाट्यलेखनाला चालना मिळणार आहे. ही स्पर्धा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या समृद्ध नाट्यपरंपरेचे जतन, संवर्धन आणि विकास करण्यासोबतच नव्या पिढीतील नाटककार, कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध नाट्यविषयक स्पर्धा व उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

लेखकांचा गौरव
पारितोषिकप्राप्त नाट्यसंहितांचे लेखक आणि त्यांच्या सर्जनशील लेखनाचा गौरव ‘नाट्यगौरव’ राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ सोमवार, २ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास नाट्यलेखक, कलाकार, दिग्दर्शक, रंगकर्मी तसेच नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पारितोषिकप्राप्त कलावंतांचा गौरव आणि मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.