

लोकलमधून मोबाइल चोरणारा सराईत जेरबंद
तीन गुन्ह्यांची उकल; ६८ हजारांचे मोबाइल हस्तगत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : रेल्वे प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या २१ वर्षीय तरुणाला डोंबिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. रेल्वे मार्गावरील घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नसतानाही पोलिसांनी शहरातील ३० ते ४० दुकाने आणि इमारतींमधील सीसीटीव्ही चित्रण तपासून आरोपीचा शोध घेतला. या कारवाईत तीन गुन्ह्यांची उकल करून ६८ हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल हस्तगत करण्यात आले.
तक्रारदार महालक्ष्मी एक्स्प्रेसने २१ ऑक्टोबरला रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास प्रवास करीत होते. गाडीचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत दुसऱ्या जनरल डब्याच्या दरवाजाजवळ उभ्या असलेल्या तक्रारदारांच्या हातातील मोबाइल एका अनोळखी तरुणाने हिसकावून पळविला. याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडलेल्या रेल्वे मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नव्हते. तसेच आरोपीबाबत ठोस माहितीही पोलिसांकडे नव्हती. त्यामुळे तपास पथकाने घटनास्थळालगतच्या शहर हद्दीतील सुमारे ३० ते ४० दुकाने आणि इमारतींमधील सीसीटीव्ही चित्रण तपासले. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करीत पोलिसांनी नासीर शेख ऊर्फ आपी (वय २१, रा. हनुमाननगर, पत्री पूल, काचोरे गाव, कल्याण पूर्व, जि. ठाणे) याला ताब्यात घेतले. त्यानंतर २८ ऑक्टोबरला रात्री ९.२० वाजता त्याला अटक करण्यात आली.
तीन मोबाइल हस्तगत
आरोपीची पोलिस कोठडीत सखोल चौकशी केली असता, त्याने तीन गुन्हे केल्याचे उघड झाले. त्याच्याकडून ३८ हजार रुपये, १५ हजार रुपये आणि १५ हजार रुपये असे एकूण ६८ हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल हस्तगत करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.