

मुंबई विमानतळावरील धावपट्ट्या सहा तास बंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (सीएसएमआयए) दोन्ही धावपट्ट्या वार्षिक देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी १९ नोव्हेंबरला सहा तास बंद ठेवण्यात येणार आहेत. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत धावपट्टी क्रमांक ०९/२७ आणि १४/३२ या दोन्ही धावपट्ट्यांवर विमानांची ये-जा पूर्णपणे बंद राहणार आहे.
पावसाळ्यानंतर दरवर्षी करण्यात येणाऱ्या व्यापक देखभाल कार्यक्रमाचा हा भाग असल्याची माहिती मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (एमआयएएल) दिली. धावपट्ट्यांची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी ही नियोजित देखभाल करण्यात येणार आहे. देखभालीदरम्यान दोन्ही धावपट्ट्यांची सविस्तर तपासणी केली जाणार आहे. धावपट्टीच्या पृष्ठभागाची आवश्यक दुरुस्ती करण्यासह रनवेवरील दिवे, विविध दिशादर्शक चिन्हे आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या यंत्रणेची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. वर्षभर विमानतळाची परिचालन सज्जता कायम ठेवण्यासाठी पावसाळ्यानंतरची ही देखभाल महत्त्वाची असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या नियोजित बंदमुळे विमानांच्या वेळापत्रकावर होणारा परिणाम कमीत कमी ठेवण्यासाठी विमान कंपन्या आणि संबंधित यंत्रणांशी सहा महिन्यांपूर्वीच समन्वय सुरू करण्यात आला आहे. विमान कंपन्यांना उड्डाणांचे वेळापत्रक तसेच आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करता यावे, यासाठी ‘नोटीस टू एअरमेन’देखील आगाऊ जारी करण्यात आली आहे. त्यामुळे १९ नोव्हेंबरला मुंबईतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या विमानाच्या वेळेची माहिती संबंधित विमान कंपनीकडून तपासून घेणे अपेक्षित आहे. नियोजित देखभालीमुळे प्रवाशांची गैरसोय कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे विमानतळ प्रशासनाने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.