

म्हाडा रहिवाशांसोबत लवकरच करणार पीएएए करार
मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पासाठी मसुदा तयार करण्याचे काम सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : म्हाडाकडून गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगरचा बांधकाम आणि विकास संस्थेच्या (सी ॲण्ड डीए) माध्यमातून समूह पुनर्विकास केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील रहिवाशांसोबत म्हाडा लवकरच कायमस्वरूपी पर्यायी घरांचा करारनामा म्हणजेच (पीएएए) करणार आहे. त्यासाठी या पीएएए करारनाम्याचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर आवश्यक मंजुरी घेऊन रहिवाशांपुढे ठेवला जाणार आहे. सदरच्या करारनाम्याबाबत रहिवाशांना विश्वासात घेऊनच पुढे जाण्याची म्हाडाची भूमिका असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मोतीलाल नगर सुमारे १४३ एकरावर वसले असून, त्याचा समूह पुनर्विकास केला जाणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत येथील ३,७०२ पात्र रहिवाशांना प्रत्येकी तब्बल १,६०० चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका विनामूल्य देण्यात येणार आहे. शिवाय, ३२८ पात्र व्यावसायिकांना ९८७ चौरस फूट क्षेत्राचे व्यावसायिक गाळे देण्यात येणार आहेत. सदर पुनर्विकास प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पुढे जात असून, आता रहिवाशांसोबत कायमस्वरूपी पर्यायी घरांचा करारनामा म्हणजेच पीएएए करण्याची म्हाडाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार सदरचा करारनाम्याचा मसूदा तयार करण्याचे काम सुरू असून, ते पुढील दोन आठवड्यात पूर्ण होईल असे म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितले. सदर करारनाम्याचा मसुदा तयार झाल्यानंतर तो म्हाडाच्या लीगल टीमकडे जाईल, त्यांनी फायनल केल्यानंतर म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांची मंजुरी घेऊन रहिवाशांपुढे ठेवला जाईल, असे बोरीकर यांनी स्पष्ट केले.
रहिवाशांना दाखवूनच पुढे जाणार
मोतीलाल नगरच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांसोबत केल्या जाणाऱ्या पीएएए कराराचा मसुदा रहिवाशांना दाखवला जाईल, रहिवाशांना विश्वासात घेऊनच पुढे जाण्याची भूमिका म्हाडाने घेतली आहे. त्यामुळे मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाला चालना मिळणार असल्याचे दिसत आहे.
टप्प्याटप्प्याने करार होणार
मोतीलाल नगर पुनर्विकासांतर्गत रहिवाशांना की टू की देण्यावर म्हाडाचा भर आहे. त्यामुळे सुरुवातीला रिकाम्या जागांवर पुनर्वसन इमारती उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे एकाच वेळी सर्व रहिवाशांशी पीएएए न करता टप्प्याटप्प्याने केला जाईल. तसेच रहिवाशांच्या असलेल्या शंकांचे निरसन करण्यावर भर दिला जाणार आहे.
कोट -
मोतीलाल नगरवासीयांसोबत म्हाडाकडून पीएएए करारनामा केला जाणार आहे. त्यासाठी कायदेशीरदृष्ट्या योग्य ड्राफ्ट तयार करून पुढील कार्यवाही केली जाईल. रहिवाशांना विश्वासात घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत.
- मिलिंद बोरीकर, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ (म्हाडा)
---------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.