भांडुप जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी ३३ कोटींचा खर्च!

भांडुप जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी ३३ कोटींचा खर्च!
Published on: 

भांडुप जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी ३३ कोटींचा खर्च!
पाणी शुद्धीकरण यंत्रणा खराब; प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील नवीन केंद्राच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने तिच्या दुरुस्तीसाठी महापालिका तब्बल ३३ कोटी ४८ लाख रुपये खर्च करणार आहे. केंद्रातील सहा पल्साट्युब क्लॅरिफायरमधील पीव्हीसी प्रोफाइल शीट्स, लॅमेला मॉड्यूल्स आणि स्टीलिंग प्लेट्स खराब झाल्याने त्या बदलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी कंत्राट देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
महापालिकेकडून दररोज सुमारे चार हजार २० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुरवठा केला जातो. यापैकी सुमारे दोन हजार ४०० दशलक्ष लिटर पाण्याचे शुद्धीकरण भांडुप संकुलात होते. या संकुलात जुन्या एक हजार ९१० दशलक्ष लिटर क्षमतेच्या केंद्राबरोबरच २०१३-१४ मध्ये कार्यान्वित झालेल्या १०० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या नवीन जलशुद्धीकरण केंद्राचाही समावेश आहे, मात्र या नवीन केंद्रातील सहा क्लॅरिफायरच्या तपासणीत यंत्रणेचे महत्त्वाचे भाग खराब झाल्याचे आढळले आहे.
क्लॅरिफायरमधील लॅमेला मॉड्यूल्स वाकले असून, त्यांचा मूळ कोन बदलला आहे. त्यामुळे गाळ (स्लज) पाण्याच्या प्रवाहासोबत मॉड्यूल्सच्या वरच्या भागातून बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले. तसेच पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणाऱ्या स्टीलिंग प्लेट्सचे सिमेंट-फायबर आवरण झिजले असून, काही प्लेट्स तुटल्या आहेत. परिणामी, गाळ वेगळा करण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असून, जलशुद्धीकरण केंद्राच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे खराब झालेली यंत्रणा बदलणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

२४ महिन्यांत दुरुस्तीचे काम पूर्ण करणार
या कामासाठी महापालिकेने ई-निविदा प्रक्रिया राबवली होती. त्यात पात्र ठरलेल्या दोन निविदाकारांपैकी मे. कुर्गो स्पेशालिटीज प्रा. लि. यांनी कार्यालयीन अंदाजापेक्षा १५.७८ टक्के कमी दराने निविदा सादर केली. वस्तू व सेवा करासह ३३ कोटी ४८ लाख ८४ हजार रुपयांच्या कंत्राटाला प्रशासनाने मान्यता दिली असून, अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवण्यात आला आहे. पावसाळ्याचा कालावधी वगळून २४ महिन्यांत टप्प्याटप्प्याने दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.