सामाजिक जाणिवेचा दीपोत्सव

सामाजिक जाणिवेचा दीपोत्सव
Published on: 

सामाजिक जाणिवेचा दीपोत्सव
रुग्णांसह मुलांना सामाजिक संस्थांची अनोखी भेट
भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीची देवाणघेवाण, मात्र समाजातील प्रत्येक घटकाला या सणाचा आनंद घेता यावा, या भावनेतून मुंबई आणि ठाणे परिसरातील सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत गरजू रुग्ण, विद्यार्थी आणि झोपडपट्टीतील मुलांसाठी विशेष दिवाळी भेट उपक्रम राबविले आहेत.

श्रद्धा फाउंडेशन आणि गुड सॅन्टा ऑर्गनायझेशन यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतून शेकडो गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सायन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सुमारे ७०० गरजू रुग्णांना श्रद्धा फाउंडेशनच्या वतीने दिवाळीनिमित्त जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या भेटवस्तूंमध्ये दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी लागणारे किराणा साहित्य, स्टेशनरी, पाण्याच्या बाटल्या, औषधपेट्या, कपडे, ब्लँकेट आणि चादरी अशा विविध वस्तूंचा समावेश होता. यासोबत पुरुष व महिलांसाठी कपडे देण्यात आले. या संपूर्ण उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रद्धा फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी स्वतः पुढाकार घेत सर्व साहित्याचे पॅकिंग केले. कोणत्याही बाह्य यंत्रणेची मदत न घेता महिलांनी एकत्र येऊन वस्तूंचे वर्गीकरण, पॅकिंग आणि वितरणाचे नियोजन केले. कर्करोग, हृदयविकार आणि थॅलेसेमिया यांसारख्या आजारांवर उपचार घेणाऱ्या लहान मुलांसह प्रौढ रुग्णांनाही संस्था मदतीचा आधार देते, अशी माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. प्रमोद इंगळे यांनी दिली. दुसरीकडे, ठाण्यातील गुड सॅन्टा ऑर्गनायझेशननेही दिवाळीनिमित्त सामाजिक उपक्रम राबविला आहे. ठाणे पश्चिम येथील ‘एलबीएस’ रोडवरील शारदा विद्यामंदिर व विद्या भवन बोर्डिंगमधील ५५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन जोड कपडे, चप्पल आणि दिवाळीचे गोड पदार्थ देण्याचे नियोजन संस्थेने केले आहे. याशिवाय या विद्यार्थ्यांच्या खाटांसाठी नवीन गाद्यांचीही व्यवस्था करण्यात येत आहे.

मुलांना कपडेवाटप
कोपरी तलाव परिसरातील सुमारे २०० झोपडपट्टीतील मुलांना कपडे आणि पादत्राणांचे वाटप करून त्यांची दिवाळी आनंददायी करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. गेल्या पाच वर्षांपासून गुड सॅन्टा ऑर्गनायझेशनतर्फे हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. डॉ. कृष्णन, राधिका कृष्णन, कृष्णा सेवानी आणि सुमेध हे संस्थेचे सक्रिय सदस्य असून, विविध सामाजिक संपर्कांच्या माध्यमातून अनेक दाते या कार्यासाठी सहकार्य करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.