

पिसे-पांजरापुरात वृक्षांची छाटणी
महापालिकेचे ९३.९० लाखांचे कंत्राट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे-पांजरापूर जलसंकुल परिसरातील धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि मृत वृक्ष हटविण्यासाठी मुंबई महापालिका तब्बल एक कोटी सात लाख ४२ हजार रुपये खर्च करणार आहे. या कामासाठी मे. डी.एस. इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून, त्यांना ९३ लाख ९० हजार रुपयांचा कंत्राट देण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
पिसे-पांजरापूर जलसंकुल परिसरात प्रशासकीय इमारत, उदंचन केंद्र, जलशुद्धीकरण संयंत्र, विद्युत उपकेंद्र, गाळणी संयंत्र, स्थिरावणी टाक्या आदी महत्त्वाच्या सुविधा आहेत. तसेच येवई येथे महासंतुलक जलाशय आणि आग्रा रोड येथे महापालिका कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. या संकुलातून मुंबई आणि उपनगरांना पाणीपुरवठा केला जातो. परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले असून, विविध ठिकाणी उद्यानेही विकसित करण्यात आली आहेत, मात्र हा परिसर नगरबाह्य विभागात येत असल्याने येथे पावसाळ्यात जोरदार वारे आणि मुसळधार पावसाचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेकदा झाडे उन्मळून पडतात, तर झाडांच्या धोकादायक फांद्या कोसळण्याच्या घटना घडतात. यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी मृत व धोकादायक झाडांचे सर्वेक्षण, मृत वृक्ष तोडून त्यांची विल्हेवाट लावणे, अनावश्यक फांद्यांची छाटणी, पामवर्गीय झाडांची फळे व झावळ्या काढणे, उन्मळून पडलेल्या झाडांची विल्हेवाट तसेच आवश्यकतेनुसार वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.
पाच कंत्राटदारांचा प्रतिसाद
पालिकेने यासाठी मागविलेल्या निविदांना पाच कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी डी. एस. इन्फ्रास्ट्रक्चर यांनी कार्यालयीन अंदाजापेक्षा ३२.४० टक्के कमी दराने निविदा सादर केली. त्यांचा दर रास्त आणि काम करण्यायोग्य असल्याचे प्रशासनाच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे. या कामासाठी कार्यालयीन अंदाज एक कोटी ३८ लाख ९० हजार रुपये होता, मात्र सर्वांत कमी दर देणाऱ्या डी. एस. इन्फ्रास्ट्रक्चर यांची निविदा स्वीकारण्याची शिफारस करण्यात आली आहे.
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.