

सुगंधी उटण्याला वर्षभर पसंती
सौंदर्यनिगा, विवाहसोहळे, दिवाळी भेटवस्तूंमध्ये वापर; परदेशातील भारतीयांकडूनही मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : नरक चतुर्दशीच्या पहाटे सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आजही कायम आहे, मात्र उटण्याच्या निर्मितीसाठी लागणारे चंदन, सुगंधी द्रव्ये आणि अन्य कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्चात सुमारे १० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे उत्पादकांनी सांगितले.
दिवाळीपुरता मर्यादित असलेला उटण्याचा वापर आता सौंदर्यनिगा, विवाहसोहळे आणि दिवाळीच्या भेटवस्तूंच्या संचापर्यंत पोहोचला आहे. मुंबई, पुणे, सातारा, मालवण यांसारख्या शहरांबरोबरच परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांकडूनही आयुर्वेदिक उटण्याला पसंती मिळत आहे. माहीम येथील दीक्षा कोठारी यांच्या कुटुंबात गेल्या ७३ वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने उटणे तयार केले जाते. यंदाच्या दिवाळीसाठी त्यांनी सुमारे ५०० किलो उटण्याची निर्मिती केली आहे. कापूर, कचुरा, नागरमोथा, कचरी, कस्तुरी, हळद, गुलाब आदी सुगंधी घटकांचा वापर करून हे उटणे तयार केले जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार लहान पाकिटांपासून मोठ्या पॅकिंगपर्यंत विविध पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत.
दरम्यान, आयुर्वेद आणि पंचकर्म क्षेत्रात गेल्या १८ वर्षांपासून कार्यरत असलेले वैद्य डॉ. तेजस वसंत लोखंडे यांनीही गेल्या १२ वर्षांपासून आयुर्वेदिक उटणे आणि अभ्यंगस्नान संचाची निर्मिती सुरू ठेवली आहे. त्यांच्या उटण्यात २३ आयुर्वेदिक घटकांचा समावेश असून, औषधी वनस्पतींची चूर्णे आणि डाळींच्या पिठांचा वापर केला जातो. त्यांच्या मते, अभ्यंगस्नान ही केवळ दिवाळीची परंपरा नसून त्वचेची निगा राखण्याशी संबंधित आयुर्वेदिक उपचारपद्धती आहे. अभ्यंग तेलाने मालिश केल्यानंतर उटण्याने शरीराला घर्षण दिल्यामुळे मृत पेशी दूर होण्यास मदत होते. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार उटण्याचा वापर वर्षभरही करता येऊ शकतो.
असा आहे दर
घटकांची गुणवत्ता आणि योग्य प्रमाण राखताना किमतींचा समतोल साधावा लागत आहे. घाऊक बाजारात साधारण १०० रुपये किलो दराने उटणे उपलब्ध असून, किरकोळ बाजारात २० ते २५ रुपयांच्या लहान पाकिटांपासून विविध पर्याय ग्राहकांसाठी आहेत. २५ ग्रॅमचे पाकीट ३५ रुपये, तर ५० ग्रॅमचे पाकीट ७० रुपये एवढी किंमत आहे.
भेटवस्तू आणि परदेशातही मागणी
उटण्याची बाजारपेठ आता किरकोळ विक्रीपुरती मर्यादित राहिलेली नाही. कॉर्पोरेट कंपन्या, संस्था आणि कुटुंबांकडून दिवाळी भेटवस्तूंच्या संचात उटण्याचा समावेश केला जात आहे. परदेशात राहणारे भारतीय नातेवाइकांमार्फत उटणे आणि अभ्यंगस्नान संच मागवत आहेत. पारंपरिक फराळासोबतच हे संचही परदेशात पाठवले जात असल्याने त्याला नवी बाजारपेठ मिळत आहे. विशेषतः अस्सल घटक, दर्जेदार पॅकिंग आणि उत्पादकाची विश्वासार्हता यांना ग्राहकांकडून महत्त्व दिले जात आहे.
रासायनिक घटकांबाबत ग्राहकांची चिंता
बाजारात कमी किमतीत उपलब्ध असलेल्या काही उटण्यांमध्ये भेसळ किंवा कृत्रिम सुगंधी घटक असण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी गुणवत्तेकडे लक्ष देण्याची गरज उत्पादकांनी व्यक्त केली.
उटणे खरेदी करताना त्यातील घटक, प्रमाण, उत्पादकाची माहिती आणि वापरण्याची पद्धत तपासणे महत्त्वाचे आहे. उटण्याशिवाय दिवाळीचे अभ्यंगस्नान पूर्ण होत नाही आणि लहानपणापासून ही सवय आहे, मात्र सध्या बाजारात मिळणाऱ्या काही रासायनिक घटकयुक्त उटण्यांमुळे त्वचेच्या तक्रारी उद्भवू शकतात.
- गार्गी दाते, ग्राहक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.