

गल्लीबोळांतील कचरा उचलण्यासाठी ई-वाहने
पालिकेचा १.०१ कोटींचा खर्च; एल विभागातील गल्ल्या स्वच्छ होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मोठ्या कचरा संकलन वाहनांना पोहोचता येत नसलेल्या अरुंद गल्ल्या, झोपडपट्ट्या आणि अंतर्गत रस्त्यांवरील कचरा संकलनासाठी आता महापालिका ई-वाहनांची मदत घेणार आहे. कुर्ला येथील एल विभागात अशा ठिकाणांवरील कचरा नियमितपणे उचलण्यासाठी सहा ई-ऑटो रिक्षा भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. त्यामुळे गल्लीबोळांमध्ये साचणारा कचरा वेळेत उचलण्यास मदत होणार असून, परिसरातील स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. या कामासाठी महापालिका सुमारे एक कोटी एक लाख ९४ हजार रुपये खर्च करणार आहे.
मुंबईतील अनेक झोपडपट्ट्या आणि दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये अरुंद रस्ते व गल्लीबोळ असल्याने मोठ्या कचरा संकलन वाहनांना प्रवेश करणे शक्य होत नाही. परिणामी, अशा ठिकाणी कचरा वेळेत उचलला जात नसल्याच्या तक्रारी येतात. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांच्या कोपऱ्यांवर कचरा साचून अस्वच्छता निर्माण होते. या समस्येवर उपाय म्हणून लहान आकाराच्या ई-ऑटो रिक्षांचा वापर करण्याचे महापालिकेने ठरवले आहे. या वाहनांच्या माध्यमातून अंतर्गत भागांत जाऊन कचरा संकलित करणे शक्य होणार आहे.
या सहा ई-वाहनांच्या पुरवठ्यासाठी महापालिकेने तीन कंत्राटदारांकडून निविदा मागवल्या होत्या. त्यामध्ये एस. के. ग्रुप ऑफ कंपनी, लक्ष्य एंटरप्रायझेस आणि एशियन ट्रेडर्स यांनी सहभाग घेतला. निविदा प्रक्रियेत एस. के. ग्रुप ऑफ कंपनीने प्रति वाहन प्रतिदिन चार हजार ४७६ रुपये असा सर्वांत कमी दर दिला. लक्ष्य एंटरप्रायझेसने चार हजार ५४३ रुपये, तर एशियन ट्रेडर्सने चार हजार ५७७ रुपये दर सादर केला. त्यामुळे एस. के. ग्रुप ऑफ कंपनीला कंत्राट देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
मंजुरीनंतर कामाला सुरुवात
या वाहनांचा वापर ३६५ दिवसांसाठी करण्यात येणार आहे. त्यानुसार दोन हजार १९० वाहन-दिवसांसाठी ९८ लाख दोन हजार ४४० रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यावर चार टक्के सादिलवार रक्कम धरून एकूण खर्च एक कोटी एक लाख ९४ हजार ५३७ रुपये ६० पैसे होणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.