

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबई महानगर प्रदेशातील वाहनांमुळे होणारे वायुप्रदूषण रोखण्यासाठी परिवहन विभागाने विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेत प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र आणि परवान्यांची वैधता तपासण्यात येणार आहे. तसेच क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणाऱ्या आणि बांधकाम साहित्य उघड्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिका अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या निर्देशानुसार १ ऑक्टोबर २०२६ला परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली वांद्रे येथील परिवहन आयुक्त कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत वाहनांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
परिवहन विभागाच्या संबंधित कार्यालयांना आपल्या कार्यक्षेत्रात नियमित तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीयूसी केंद्रांची अचानक आणि यादृच्छिक तपासणी करण्याबरोबरच तपासणी नाक्यांवरील वाहन तपासणी अधिक तीव्र करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर प्रचलित कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, मोहिमेतील तपासणीचा दैनंदिन अहवाल भरणे संबंधित कार्यालयांना बंधनकारक करण्यात आले आहे.
कंत्राटदाराकडून बांधकाम साहित्याची वाहतूक करताना वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे हवा प्रदूषण होत असून, याप्रकरणी दंडात्मक कारवाई न करता ती वाहने जप्त केली जावीत किंवा कंत्राटदाराचा परवाना रद्द करायला हवा, तरच याला आळा बसू शकेल.
- सुमेरा अब्दुलअली, संस्थापक, आवाज फाउंडेशन
मुंबई महानगर प्रदेशातील वाहनांमुळे होणारे वायुप्रदूषण रोखण्यासाठी परिवहन विभागाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. बांधकाम साहित्य वाहतूक करणारे कंत्राटदार तसेच वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल.
- अनिल पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अंधेरी
बांधकाम साहित्य वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण ही पालिकेची जबाबदारी आहे. पालिकेच्या परवानगीशिवाय ही वाहतूक होऊ शकत नाही तर आरटीओने कारवाई करताना तंत्रज्ञानाची मदत घ्यायला हवी; जेणेकरून अशा गोष्टीला आळा बसेल.
- गोपाळ झवेरी, सामाजिक कार्यकर्ते
केवळ तपासणी मोहीम राबविण्यापुरते मर्यादित न राहता प्रदूषण नियंत्रणासाठी सातत्याने कार्यवाही करणे आवश्यक आहे. हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे नागरिकांना अल्पकालीन तसेच दीर्घकालीन श्वसनविकार व इतर गंभीर आरोग्य समस्यांचा धोका निर्माण होऊ शकतो.
- सुशील पठारे, वाहतूक अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.