

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सामाजिक बळ
‘महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी’ची स्थापना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : ‘राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात बाधित नागरिकांना मदत करण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी अधिक निधी उपलब्ध व्हावा,’ या उद्देशाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आता सामाजिक सहभागाचे बळ मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी’ची स्थापना करण्यात आली आहे. कंपन्या, संस्था, देणगीदार आणि इतर सामाजिक घटकांच्या सहभागातून अतिरिक्त निधी उभारून तो गरजू रुग्णांसह विविध आपत्तींत बाधित नागरिकांच्या मदतीसाठी वापरता येणार आहे. त्यामुळे महागड्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना अधिक आर्थिक मदत देण्याबरोबरच दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती आणि अन्य आपत्कालीन परिस्थितीतही मदतीचा हात पुढे करता येणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे हृदयरोग, कर्करोग, मूत्रपिंडविकार, मेंदूविकार यांसह विविध गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया, महागडे आणि दीर्घकालीन उपचारांसाठी अधिक मदत उपलब्ध करून देता येणार आहे. गरजेनुसार औषधे, वैद्यकीय साहित्य आणि उपचारासाठी आवश्यक इतर बाबींसाठीही मदत करता येणार आहे. दुर्मिळ आजारांवरील उपचारांसाठीही या माध्यमातून विशेष मदत उभारता येणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या आढावा बैठकीत रुग्णांच्या उपचारासाठी सामाजिक दायित्वातून अतिरिक्त निधी उभारण्याच्या पर्यायांचा अभ्यास करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार ‘महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी’ची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून कंपन्या, संस्था आणि देणगीदारांच्या सहभागातून उभारलेला निधी गरजू रुग्णांच्या उपचारासाठी वापरता येणार आहे. रुग्णालये, स्वयंसेवी संस्था, कंपन्या आणि सामाजिक संस्थांना गरजेनुसार एकत्र आणून विविध वैद्यकीय मदतीचे उपक्रमही राबविता येणार आहेत.
...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या नव्या व्यवस्थेमुळे गरजू रुग्ण आणि आपत्तीग्रस्त नागरिकांना मदतीचा आणखी एक आधार उपलब्ध होणार आहे. कंपन्या, संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या लोकसहभागातून अधिकाधिक गरजूंपर्यंत मदत पोहोचविता येणार आहे. या उपक्रमासाठी दात्यांनी पुढे येऊन आपले योगदान द्यावे.
- रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.